सोलापूर PM Narendra Modi : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावाजवळ रे नगर इथं झालेल्या कार्याक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवारी (19 जानेवारी) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर होते. इथं पीएम आवास योजनेंतर्गत देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं. यावेळी ''अशी घरं ज्यावेळी पाहतो, त्यावेळी मलाही अशा घरात राहाण्याची संधी मिळायला हवी होती.'' असं म्हणत मोदी भावूक झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार नरसय्या आडम उपस्थित होते.
काय घडलं नेमकं ? : "आज मी या गोष्टी पाहतो, तेव्हा मनाला समाधान मिळतं. हजारो कुटुंबाचं स्वप्न साकार होत आहे. ही खरी माझी कमाई आहे. तसंच, पीएम आवास योजनेतंर्गत आज सर्वात मोठ्या सोसायटीचं लोकार्पण झालं. मला लहानपणी अशा घरात रहायला मिळाल असतं तर?. हे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं दिसलं." पुढं ते म्हणाले की, "आज देशातील 4 ते 5 कोटी जनतेला आम्ही पक्क घर देऊ शकलो. या जनतेला किती आनंद झाला आहे हे तेच सांगतील. देशात दीर्घकाळपर्यंत 'गरीबी हटाव' चे नारे दिले गेले. परंतु, गरीबी गेली नाही. कारण गरीबांच्या नावावर योजना होत होत्या. मात्र त्याचा लाभ योग्य लाभार्थीला मिळत नव्हता," असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावलाय.
रामज्योत लावावी : "आधी सरकारची नीती, निष्ठा आरोपीच्या पिंजऱ्यात होती. परंतु, आता तुम्ही बघितलेले दिवस तुमच्या मुलांना बघायला मिळणार नाहीत. झोपडीऐवजी आता पक्क्या घरात तुम्हाला राहण्यास मिळणार आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना, गोरगरीब नागरिकांना उच्चभ्रू सोसायटी प्रमाणे घरं उपलब्ध झाली," असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान, यावेळी पंतप्रधांनी "22 जानेवारी रोजी भगवान राम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहे. संताच्या मार्गदर्शनाखाली मी यम नियमांचं कठोर पालन करत आहे. 22 तारखेला संध्याकाळी सर्वांनी घराघरात रामज्योती लावावी." असं आवाहनही सभेतील उपस्थितांना केलं.
14 वर्षांची प्रतिक्षा : "सोलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावाजवळ रे नगर गृहप्रकल्पाचं कामकाज चौदा वर्षांपूर्वी सुरू झालं होतं. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी ही घर झाली आहेत. सुरुवातीला दहा हजार घरांचा आराखडा तयार करण्यात आला होता. कामगारांची मागणी पाहून पुन्हा वीस हजार घरांची वाढ करण्यात आली. तीस हजार घरांचा हा प्रकल्प आशियातील सर्वांत मोठा प्रकल्प आहे" अशी माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली. मेट्रो शहरांमध्ये ज्या प्रमाणं वसाहती निर्माण झाल्या आहेत, त्याप्रमाणे सोलापुरातील कुंभारी गावाजवळ रे नगर वसाहत निर्माण करण्यात आली आहे.
हेही वाचा :
1 बाळासाहेबांनी 'ज्यांना' वाचवलं तेच शिवसेना संपवायला निघालेत, उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा
2 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेगा प्रोजेक्टचं उद्घाटन; म्हणाले 'माझं आणि सोलापूरचं जुनं नातं'
3 अंध विद्यार्थिनीची अनोखी रामभक्ती, राम गीत गाऊन केली प्रभू श्रीरामाची आराधना