ठाणे Vegetable Price Hike : मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरात प्राधान्याने जुन्नर, पुणे, नाशिक, लातूर या ठिकाणाहून भाज्यांची आवक होत असते. सध्या काही ठिकाणी पूर परिस्थिती तर काही ठिकाणी दुष्काळ पडलेला पाहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसापासून भाज्यांचे दर (Vegetables) गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहेत. यामुळं गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे.
मार्केटमध्ये भाज्यांची आवक कमी : भाजी हा गृहिणींंच्या दैनंदिनीतील महत्वाचा घटक आहे. विक्रेते आणि ग्राहक दोघेही भाज्यांचे दर केव्हा कमी होणार याची वाट पाहात आहेत. या संदर्भात थेट ठाणे भाजी मार्केटमधून आढावा घेतला असता भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक कमी आहे. भाज्यांचा दर्जा देखील खालावलेला आहे. पावसामुळं भाज्या लवकर खराब होतात. यामुळं महिला भगिनींना भाज्या रडवत असल्याचं एका महिला ग्राहकानं सांगितलं.
महागाईने नागरिक हवालदिल : आधीच गॅस, पेट्रोल, डिझेल, दूध, मोबाईल रिचार्ज आणि आता भाज्या महागल्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. शाळांची फी, वह्या-पुस्तके, युनिफॉर्म या सर्वच गोष्टी महाग झाल्यामुळं नागरिक हवालदिल झाला आहे.
अजून काही दिवस भाज्या महागच : अजून काही दिवस अशाच प्रकारे भाज्या महाग मिळणार असल्याचं विक्रेते सांगतात. पावसाचं प्रमाण व्यवस्थित झाल्यावर भाज्यांचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन पीक आल्यावर भाज्यांच्या किंमती कमी होवू शकतात. राज्याबाहेरील भाज्यांची जर आवक सुरू झाली तरच किंमतीत फरक पडू शकतो, असं भाजी विक्रेते सांगतात. एकंदरीत भाज्यांचे दर गगनाला भिडल्यानं मध्यमवर्गीय कुटुंबावर आर्थिक बोजा अधिक वाढला आहे.
काय आहेत भाज्यांचे भाव : भेंडी -120 रुपये किलो, गवार - 120 रुपये किलो, पावटा - 200 रुपये किलो, फरसबी - 160 रुपये किलो, वाटाणा - 200 रुपये किलो, वांगी - 80 रुपये किलोटोमॅटो - 100 रुपये किलो, लसूण - 320 रुपये किलो, कांदा ६० रुपये, बटाटा ६० असे ठाण्याच्या मार्केटमध्ये भाज्यांचे भाव आहेत.
हेही वाचा -
गृहिणींचं बजेट कोलमडलं; चिकनपेक्षा शेवगा महाग, इतर भाज्यांचे दरही शंभरी पार - Vegetable Rates Hike