मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते. दरम्यान, महायुती सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईतील प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफीचा निर्णय घेतलाय. महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. तसंच यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
महाविकास आघाडीला टोला : प्रताप सरनाईक म्हणाले की, "सर्वसामान्य जनतेचा प्रश्न होता की ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथील टोल नाके बंद व्हायला पाहिजे. आघाडी सरकारच्या कार्यकाळात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे टोलनाके आपल्या मुंबई ठाण्याच्या लोकांवर टाकले होते. 2009 साली मी पहिल्यांदा शिवसेनेचा आमदार झालो. तेव्ही मी आणि एकनाथ शिंदे विरोधी पक्षाच्या सदस्य असताना आम्ही आनंदनगर टोल नाक्यावर आंदोलन केलं होतं. पाच वर्षांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे काही टोल नाके आहेत, ते मी कुठलाही परिस्थितीमध्ये बंद करेन, असं वचन दिलं होतं. आज त्यांनी त्याची पूर्तता केली. मी महायुती सरकारचं अभिनंदन करतो.
मुख्यमंत्र्यांनी धडाकेबाज निर्णय घेतला : राज्यात आघाडीचं सरकार असताना सर्वसामान्य माणसाचा खिसा खाली करण्यासाठी हे टोल लावले गेले होते. आज करू, उद्या करू म्हणून गेले 10 वर्षांपासून टोलनाके बंद करण्यात आले नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे. आम्ही त्यांचे आभार मानतो असंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
टोल कर्मचाऱ्यांना फुलं देवून केलं होतं आंदोलन : ठाणे ते मुंबईला जोडणारा मुख्य रस्ता असलेल्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी हा गेल्या अनेक दशकांपासून चिंतेचा विषय होता. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि राजन विखारे हे तीन नेते आमदार झाले होते. आमदार म्हणून शपथ घेण्यापूर्वी त्यांनी आनंदनगर टोल नाक्यावरती टोल कर्मचाऱ्यांना फुलं देवून आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनानंतर ते शपथविधीसाठी मुंबईला रवाना झाले होते. आज या घटनेला 15 वर्ष झाल्यानंतर अखेर राज्य सरकारनं हलक्या वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय घेतलाय.
हेही वाचा