अकोला Prakash Ambedkar : वंचितचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यक्रमांना तसेच बैठकींना न जाण्याचे आदेश प्रकाश आंबेडकरांनी दिले आहेत. ते आज (3 मार्च) अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे ते म्हणाले, "महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत जागा वाटपाचा प्रश्न सुटलेला नाही. आम्ही त्यांना २७ जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी त्या दिल्या नाही किंवा चर्चा केली नाही तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीत लढू आणि भाजपा विरुद्ध वंचित असा सामना या निवडणुकीत होणार आहे. अकोला लोकसभा मतदार संघात मी स्वत: लढणार आहे. त्यासोबतच वर्धा आणि सांगली संदर्भातला निर्णय राखून ठेवला आहे. इतर कोणत्याही मतदार संघात आम्ही उमेदवार जाहीर केलेला नाही. आम्ही सध्या महाविकास आघाडीशी चर्चा करीत आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांच्याशी जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहोत; परंतु आम्ही भाजपा सोबत जाणार नाही, असंही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.
तर पूर्ण ताकदीनिशी लढू : सध्या महाविकास आघाडीसोबतची चर्चा सुरू आहे. तरीही महाविकास आघाडीतील काही पक्षांकडून आमच्या कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्रम, बैठकीसाठी निरोप येत आहेत. या बैठकी, कार्यक्रमांना जाऊ नये, असे आदेशच आंबेडकरांनी दिले आहेत. प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर आणि माझ्याकडून यासंदर्भात कुठल्याही सूचना येत नाही, तोपर्यंत कोणीही महाविकास आघाडीतील पक्षांच्या सोबत राहू नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं. चर्चा जर अयशस्वी झाली तर भाजपा विरोधात वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत लढणार आहे. सर्व जागांवर आम्ही उमेदवार उभे करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मोदींनी माझ्या विरोधात लढावं : महाविकास आघाडीसोबत जर चर्चा यशस्वी झाली नाही तरीही मी अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढणार आहे. भाजपाला मला रोखण्याचा प्रयत्न करायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या विरोधात अकोल्यातून लढावं, असं आव्हानच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केलं.
अजित पवारांची चौकशी व्हायलाच हवी : घोटाळा झाला आहे. अधिकाऱ्यांनीही ते मान्य केलं आहे. त्यामुळे यासंदर्भात अजित पवारांची चौकशी व्हायलाच हवी. चौकशी झाली नाही तर सत्ता बदल झाल्यास चौकशीसाठी आम्ही आग्रही राहू, असा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिला आहे.
हेही वाचा: