छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Potholes On Samruddhi Mahamarg : वेगात दोन जिल्ह्यांचे अंतर कापण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. माळीवाडा टोलनाकापासून वैजापूर दिशेनं जाताना जवळपास दहा किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात रस्ता खराब झालाय. काही महिन्यांपूर्वी रस्त्याला तडे जाण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता सिमेंटचे पोपडे निघून गेल्यानं रस्त्याच्या कामाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
समृद्धी महामार्गावर खड्डे (ETV Bharat Reporter) समृद्धी महामार्गाचा रस्ता झाला खराब : नागपूर मुंबई अंतर अवघ्या काही तासांमध्ये कापण्यासाठी राज्य सरकारनं मोठा गवगवा करत समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. कोट्यवधी रुपये खर्च करून अनेकांच्या जमिनीचं अधिग्रहण करून वेगवान महामार्ग तयार करण्यात आला. आता पर्यंतचा सर्वात मोठा आणि मजबूत असा 701 किलोमीटरचा मार्ग तयार झाल्याचा दावा राज्य सरकारनं केला. मात्र, मागील काही महिन्यांमध्ये या रस्त्याच्या कामाला दर्जा आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय. दोन महिन्यांपूर्वी रस्त्याला तडे गेल्याची घटना ताजी असताना आता रस्ताचे पोपडे निघाले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. वेगवान मार्ग असल्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग 100 पेक्षा अधिक असतो. मात्र, अचानक आलेल्या वाहनांचा खराब रस्त्यामुळं अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु अशा पद्धतीनं सिमेंट रस्त्याची दुरवस्था झाल्यानं काम करताना कामाचा दर्जा का राखण्यात आला नाही? असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थितीत केलाय.
टोल देऊन रस्ता निकृष्ट : समृध्दी महामार्गावरून प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टोल अकराला जातो. 1.70 पैसे प्रति किलोमीटर इतका टोल आकारण्यात येत असला तरी त्या मानाने रस्त्याचा दर्जा नसल्याचा ओरड प्रवाशांनी केला. वेगानं जात असताना वाहन स्थिर चालत नाहीच, शिवाय रस्त्याला तडे गेले तर कुठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याला इतका टोल द्यावा का? असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केलाय. समृद्धी महामार्गावरून जाताना पैसे देऊन देखील सुरक्षित प्रवास होईल याची शाश्वती नाही. त्यामुळं महामार्ग तयार करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई होणार कधी? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
हेही वाचा -
- वर्षातच समृध्दी महामार्गाला तडे, तातडीनं दुरुस्ती सुरू - Cracks on Samruddhi Highway
- दीड वर्षातच ‘समृद्धी’ला भगदाड; शिंदे-फडणवीस सरकारचा भ्रष्टाचारही उघड - नाना पटोले
- समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालकाला डुलकी लागल्यानं तीन जणांचा मृत्यू