पुणे President Droupadi Murmu: भारतीय प्रशासकीय सेवेतून निवड रद्द करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांच्या प्रकरणात सुरुवातीपासून हे प्रकार उघडकीस आणणारे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील बोगस प्रमाण पत्रांची चौकशी करण्यात यावी, असं पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविलं होतं. याबाबत राष्ट्रपती यांनी यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील बोगस प्रमाण पत्रांच्या चौकशीच्या याचिकेवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी याबाबत माहिती देताना समाधान व्यक्त केलं आहे.
राष्ट्रपतींकडून कारवाई करण्याचे निर्देश : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये फसव्या प्रमाणपत्रांच्या वापराची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील आयोगाची नियुक्ती करण्याची विनंती करणारी याचिका कार्मिक मंत्रालयाकडे पाठवली आहे. या प्रकरणावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिले आहेत.
स्पर्धा परीक्षेची विश्वासार्हता कमी झाली- "यूपीएससी परीक्षेसह इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अवाजवी फायदा मिळवण्यासाठी जात, अपंगत्व, क्रीडा आणि इतर विशेष श्रेणींशी संबंधित फसव्या प्रमाणपत्रांच्या वाढत्या गैरवापराबद्दल गंभीर चिंता मी राष्ट्रपतींकडे पत्राच्या द्वारे व्यक्त केली होती. फसव्या प्रमाणपत्रांच्या वाढत्या गैरवापरामुळे परीक्षांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता कमी होऊ लागली होती," असं विजय कुंभार यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
कागदपत्रांची कठोरपणे पडताळणी करण्यात यावी-"पुण्यातील पूजा खेडकर यांनी ओबीसी नॉन-क्रिमी लेयर श्रेणी अंतर्गत आयएएस पद मिळवलं. तसेच ज्यांनी अतिरिक्त गुण, नोकऱ्या किंवा पदोन्नती मिळवण्यासाठी फसव्या प्रमाणपत्रांचा वापर केला असेल त्यांच्या प्रमाणपत्रांची चौकशी करण्यात यावी. तसेच येथून पुढे संबंधित परिक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वी उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची कठोरपणे पडताळणी करण्यात यावी. याव्यतिरिक्त बोगसगिरी रोखण्यासाठी सर्व संबंधित कागदपत्रं तत्काळ जप्त करण्याची आणि सुरक्षित ठेवण्याची तसेच नॉन क्रिमी लेयर स्थितीचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या मालमत्ता आणि उत्पन्नाच्या घोषणेची छाननी करण्याची मागणी केली होती. ही मागणी राष्ट्रपती यांनी मान्य केली आहे. तशा सूचना देखील दिल्या आहेत, असं विजय कुंभार यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा
- पूजा खेडकर यांच्या वडिलांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल; दबाव पडला महागात - FIR On Pooja Khedkar Father
- पूजा खेडकर बोगस कागदपत्र प्रकरणानंतर सरकारला जाग, जात प्रमाणपत्र कायद्यात अखेर सरकारनं केली सुधारणा - Fake Caste Certificate
- पूजा खेडकर यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; यूपीएससीनं उमेदवारी रद्द केल्यानं दाखल केली याचिका - Puja Khedkar Moved Delhi High Court