पुणे Pooja Khedkar IAS : पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांची काल उचलबांगडी करत त्यांची वाशिम जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आली. खेडकर यांच्या खासगी गाडीवर लावण्यात आलेला लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारणाऱ्या या आयएएस अधिकारी अशी खेडकर गेले काही दिवस समाजमाध्यमांमधून रुढ झाली आहे. पूजा खेडकर यांच्या आयएएस बनण्याबाबत अनेक प्रकरणं आत्ता चर्चिली जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आत्ता या आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दाखवून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. तर दिल्लीतील एम्समध्ये तब्बल सहा वेळा मेडिकल टेस्टला गैरहजर असलेल्या व्यक्तीला आयएएस हा प्रशासकीय सेवेतला सर्वात मोठा दर्जा कसा देण्यात आला, याची आत्ता जोरदार चर्चा सुरू आहे. एवढंच नव्हे तर पूजा खेडकर या ओबीसी नॉन क्रीमीलेअर या गटातून आयएएस झाल्या आहेत. त्यांच्या वडिलांच्या शपथपत्रात 40 कोटी रुपये उत्पन्न दाखवण्यात आलं आहे. असं असताना पूजा खेडकर यांना ओबीसी नॉन क्रीमीलेअर सर्टिफिकेट मिळालं कसं? असा प्रश्न आत्ता उपस्थित होत असून सरकारनं याबाबत चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.
दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दाखवून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण : स्वतःच्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोयी-सुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दाखवून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. पूजा खेडकर या व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टिदोष असल्याचं सर्टिफिकेट दाखवून आयएएस उत्तीर्ण झाल्या, असं सांगितलं जातं आहे. पूजा खेडकर यांना आयोगानं सहा वेळा दिल्लीच्या एम्समध्ये वैद्यकीय चाचणीसाठी बोलावलं असतानादेखील त्या गेल्या नाहीत. उलट कुठल्यातरी सेंटरमधून त्यांनी एमआरआय करून त्याचा अहवाल मिळवत ते सादर केलं आहे. त्यामुळं पूजा खेडकर यांचं कलेक्टर बनणं हेच वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे यूपीएससी आणि केंद्रीय नागरी सेवा न्यायप्राधिकरण (CAT) नं विरोध केला असतानाही त्यांना आयएएस पद कसं देण्यात आलं? त्यांच्या नियुक्तीमागे राजकीय हस्तक्षेप तर नाही ना ? असे अनेक प्रश्न आत्ता पुढे येत आहे.
कोण आहेत पुजा खेडकर ? : पुजा खेडकर या 2022 बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी असून जून महिन्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांची पुण्यामध्ये नियुक्ती झाली. त्यानंतर चमकोगिरी केल्यानं वादात सापडलेल्या पूजा खेडकर यांची वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे. पूजा खेडकर या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. दिलीप खेडकर हे राज्याच्या प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर वंचितच्या पाठिंब्यावर त्यांनी अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली. तर आई मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.
शिक्षा व्हायला हवी : याबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार म्हणाले की, "पूजा खेडकर यांचं वर्तन आणि शैक्षणिक पात्रता आयएएस अधिकाऱ्याच्या प्रतिष्ठेला साजेशी निश्चितच नाही. तरीही त्यांच्या प्रत्येक कृत्याकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष केलं गेलं. त्यांनी जे काही केलं आहे ते पाहता त्यांची बदली करणं ही शिक्षा नव्हे. त्यांना यापेक्षा मोठी शिक्षा व्हायला पाहिजे. त्यांची झालेली बदली लक्षात घेता त्यांचं राजकीय वजन काय असेल, याचा अंदाज घ्यायला हवा. तसंच त्यांनी एका पात्र उमेदवाराच्या अधिकारावर अतिक्रमण करत सनदी अधिकारी होण्याचं स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं आहं." या सगळ्या प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारनं चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा