नाशिक : नायलॉन मांजा वापरावर बंदी असतानाही उत्पादन, विक्री व वापर करत असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई होणार आहे. नाशिक पोलीस आयुक्तांकडून घातक नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आलेल्या आरोपींची यादी तयार करण्यात येत आहे. आरोपींवर आता मोक्का तसंच तडीपार अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
कडक कारवाईचे आदेश : मकरसंक्रात सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात ठिकठिकाणी पतंग, मांजांची दुकानं थाटली आहे. या पार्श्वभूमीवर चायनीज मांजा, नायलॉन मांजा, काचेचा चूऱ्याचे कोटिंग असलेला मांज्याची विक्रीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बंदीचे आदेश दिले आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दोघांना तडीपार करणार : नाशिक शहरातील पंचवटी परिसरात राहणारे शुभम अहिरे आणि इमरान शहा यांच्याकडून पोलिसांनी 65 हजार 800 रुपये किमतीचा नायलॉन मांजाचे 99 गट्टे जप्त केलेत. या संदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही तडीपार करण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत.
नायलॉन मांजामुळं मुलाचा मृत्यू : 9 नोव्हेंबर 2024 रोजी वडाळा गावातील नऊ वर्षीय विष्णू जोशी हा मुलगा खेळत असताना नायलॉन मांजा मांडीला त्याच्या चिरून गेल्यानं अतिरक्तस्त्राव झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्याची प्रकृती अधिकच खालावल्यानं त्याचा मृत्यू झाला. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
37 मांजा विक्रेत्यांवर कारवाई : जीवघेण्या नायलॉन मांजा विक्रीला बंदी असतानाही नाशिक शहरात छुप्या पद्धतीनं विक्री केली जात होती. जानेवारी 2024 मध्ये नाशिक पोलिसांनी कारवाई करत 37 नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई केली होती. यापुढे नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पालकांवर होणार कारवाई : "नायलॉन मांजा विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. यापुढेही नायलॉन मांजाद्वारे पतंग उडवण्यावर व त्यांच्या पालकांवरही कारवाई केली जाईल," असं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलं.
खंडपीठाचा महत्त्वपूर्ण आदेश : मांजा सापडेल ते ठिकाण सील करावं. अल्पवयीन मुलांकडे नायलॉन मांजा कुठून आणला याची माहिती लपवली तर पालकांवरही गुन्हा दाखल करावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत.
हेही वाचा