छत्रपती संभाजीनगर Firozpur Triple Murder Case : देशाला हादरा देणाऱ्या पंजाबमधील फिरोजपूर इथल्या तिहेरी हत्याकांडात सामील असलेल्या सात शस्त्रधारी आरोपींना अटक करण्यात आली. घटनेनंतर हे आरोपी समृध्दी महामार्गवरुन पळून जाणार असताना पंजाब पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांना माहिती दिली. गुन्हे शाखा पोलीस आणि सिडको पोलीस यांनी पहाटे पावणे सहा वाजता सापळा रचून गाडी अडवली आणि मुख्य आरोपींना ताब्यात घेतलं. शनिवारी सायंकाळी या आरोपींना पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
सात शार्प शूटर पंजाबमधून आले पळून : शनिवारी पहाटे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी धाडसी कारवाई करून संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतलं. फिरोजपूर, पंजाब येथील तिहेरी हत्याकांडात सामील असलेल्या सात अत्यंत जहाल आरोपींना अटक करण्यात आली. या धक्कादायक घटनेत काही दिवसांवर लग्न आलेल्या एका तरुण महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. शस्त्रांनी सुसज्ज असलेले हे आरोपी घटनेनंतर महाराष्ट्रात पळून आले. याबाबत माहिती मिळताच राज्यात अलर्ट देण्यात आला. संभाजीनगर हद्दीतून जात असताना आरोपींना ताब्यात घेण्यात यश आलं.
बुलेटप्रूफ जॅकेट घालून पोलिसांनी ठोकल्या बेड्या : पंजाबमधील शार्प शूटर महाराष्ट्रात येत असल्याची माहिती मिळताच पहाटे 3:00 वाजता पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना मोबाइलवर पंजाब पोलिसांच्या AGTF चे ADG प्रमोद बान यांचा फोन आला. अत्यंत गंभीर आणि तातडीची मदत हवी असं त्यांना सांगण्यात आलं. क्षणाचाही विलंब न करता शहर पोलीस दलानं तातडीनं पथक तयार करत आरोपींचा माग घ्यायला सुरूवात केली. एमएच 26 एसी 5599 क्रमांकाच्या गाडीत आरोपी समृद्धी महामार्गावरुन येत असल्याची माहिती मिळताच त्या गाडीला सकाळी 5:45 वाजता छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अडवलं. अत्यंत धाडसीपणानं गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे आणि सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखालील शहर पोलिसांच्या 10 अधिकाऱ्यांसह 40 कर्मचाऱ्यांचं पथक आणि QRT पथक्कानं शस्त्रधारी आरोपींना बुलेटप्रूफ जॅकेट घालून पकडलं. आता पंजाब पोलीस आमच्याशी सातत्यानं संपर्कात आहेत. आरोपींना शनिवारी संध्याकाळी त्यांच्या ताब्यात दिलं जाईल, अशी माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा :
- वनराज आंदेकर खून प्रकरणात 13 जणांना अटक, ताम्हिणी घाटातून आवळल्या मुसक्या - Vanraj Andekar Murder Case
- नेरुळमधील दोन रियल इस्टेट एजंटच्या हत्येचं उकललं गूढ; सुपारी देत एकाची हत्या, तर दुसऱयाचा केला 'असा' गेम - Nerul Double Murder Case
- पुण्यात तरुणीचा निर्घृण खून, हातपाय कापून धड फेकलं नदीपात्रात, नागरिक हादरले - Found Girls Body Parts In Pune