पिंपरी चिंचवड Police Extortion in Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. अमली पदार्थ विक्री करण्याच्या खोट्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वडिलांना 20 लाखांची खंडणी मागीतल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयीन तरुणांच्या वडिलांकडून ऑनलाइन पद्धतीनं 4 लाख 98 हजार रुपये स्वीकारल्याचाही आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षाच्या मुलासह एकूण आठ संशयित लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील 4 जणांना देहुरोड पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
आठ संशयित आरोपी : यात हेमंत गायकवाड, सचिन शेजाळ, अमान अमीन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा, शंकर गोर्डे, मुन्ना स्वामी, अनिल चौधरी अशी सहभागी असलेल्या संशयित आरोपीची नावं असून यातील हेमंत गायकवाड व सचिन शेजाळ हे दोघे पोलीस कर्मचारी असून सध्या देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तर अमान अमीन शेख हा कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अमीन शेख यांचा मुलगा आहे. तर वैभवसिंग मनीषकुमारसिंग चौहान यानं याप्रकरणी फिर्यादी दिलीय.
नेमकं प्रकरण काय : पोलीस आयुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौहान हा तरुण किवळे येथील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिक्षण घेतो. यादरम्यान त्याची ओळख अमान सोबत झाली. आमन यानं देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी शेजाळ व गायकवाड यांना सोबत घेऊन पीडित विद्यार्थी अमली पदार्थ विक्री करत असल्याचा कट रचला. यानंतर देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन अंमलदार आणि अन्य आरोपींनी मिळून चौहानकडून पैसे उकळण्याची योजना आखली. त्यानुसार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी आरोपींनी किवळे येथील एका कॅफे मधून फिर्यादीचं अपहरण केलं. त्यानंतर पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांना फोन करुन कारवाईची भीती दाखवत दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी वीस लाख रुपयांत तडजोड करण्यासाठी धमकावलं. तडजोडीअंती 8 लाख रुपये देण्याचं ठरलं. यानंतर 4 लाख 98 हजार रुपये आरोपींना पाठवल्याचंही समोर आलंय.
चार जण ताब्यात : मात्र यानंतर पीडित विद्यार्थ्यांच्या वडिलांनी घडलेल्या प्रकाराची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. सध्या या कटात सहभागी असलेल्या आठ संशितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अमीन शेख यांचा मुलगा अमान शेख, अनील चौधरी, हुसेन डांगे, मोहम्मद अहमर मिर्झा या चारही संशयीतांना देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस कर्मचारी शेजाळ व गायकवाड यांच्यासह अन्य दोन आरोपी हे फरार असून देहूरोड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा :