मुंबई Sanjay Raut on Modi : मालवण, राजकोट, येथे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांची आणि शिवप्रेमींची जाहीर माफी मागितली आहे. या माफीनाम्यावरून राजकारण तापलेलं असताना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी ही राजकीय माफी असल्याचं सांगितलं आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे माफीनाम्याचं राजकीय नाट्य सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत ते बोलत होते.
संतापाचा ल्हावा पूर्ण महाराष्ट्रामध्ये - याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पालघर येथे वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्याला आले असताना तेथील आदिवासी आणि कोळी बांधवांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. मोदी गो बॅक अशा घोषणा दिल्या. त्यांचा निषेध केला. मोदी यांनी पहिलं की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट किल्ल्यावरून कोसळल्यानंतर जो संतापाचा ल्हावा पूर्ण महाराष्ट्रामध्ये उसळला आहे. ते पाहता जर आपण माफी मागितली नाही, तर भविष्यात महाराष्ट्राच्या संतापाला तोंड द्यावं लागेल, म्हणून मोदी यांनी काल राजकीय माफी मागितली आहे. तसंच उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी, म्हणून त्यांनी राजकीय माफी मागितली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम, महाराष्ट्रा विषयी प्रेम, आत्मीयता हे असण्याचं कारण नाही. पण जर का माफी मागून प्रश्न सुटत असतील तर माफी मागावी असा सल्ला त्यांना राज्यातील लोकांनी दिला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही - संजय राऊत पुढे म्हणाले की, या माफीने प्रश्न सुटत नाहीत. ज्या पद्धतीचा घोर अपमान या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी निर्माण केलेले हे सरकार व संकट आहे. मोदींनी माफी मागून त्यांचं काम केलं आता महाराष्ट्र महाराष्ट्राचे काम करेल. उद्यापासून सरकारला जोडे मारण्याचा जो कार्यक्रम आहे त्यात कुठलाही बदल होणार नाही. उद्या ११ वाजता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत लाखो कार्यकर्ते एकत्र येतील व या सरकारला जोडे मारण्याचा कार्यक्रम करतील. पंतप्रधानांना जर खरोखर या घटनेचं गांभीर्य असतं तर पाच वर्षांपूर्वी पुलवामात ४० जवानांची हत्त्या झाली तेव्हाही त्यांनी देशाची माफी मागितली असती. जम्मू-कश्मीरमध्ये पंडितांवर जो अत्याचार होत आहे, त्याबद्दल माफी मागितली असती. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे, त्याबद्दल माफी मागितली असती. पण प्रत्येक वेळेला फायदा डोळ्यासमोर ठेवून पावले टाकायची ही पंतप्रधानांची खासियत आहे. पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांची मागितलेली माफी हा व्यक्तिगत राजकीय विषय आहे. ही जर का माफी मागितली नसती तर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही असं त्यांना वाटतं, असंही राऊत म्हणाले.
संजय राऊत यांचे अनेक प्रश्न - संजय राऊत पुढे म्हणाले की, या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जी भूमिका बजावली आहे. त्याचा तपास कोण करणार? आरोपींना अटक कोण करणार? ज्यांनी शिल्पकाराला हे काम दिलं, त्याचा तपास कोण करणार? सार्वजनिक बांधकाम खात्याचं हे काम असताना त्या मंत्र्याचा राजीनामा कोण घेणार? या पुतळ्या मागे जे ठाणे कनेक्शन आहे, त्याचा सूत्रधार वर्षा बंगल्यावर आहे, त्याचा राजीनामा कोण घेणार? अशाप्रकारे प्रश्नांची सरबत्ती संजय राऊत यांनी केली आहे.
हेही वाचा..