छत्रपती संभाजीनगर No More Free Education In CSMC : सध्या सीबीएससी शिक्षण घेण्यासाठी पालकांची धडपड पाहायला मिळते. नवीन शिक्षण प्रणाली गोरगरिबांच्या मुलांना मिळावं, यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं सीबीएससी शाळा सुरू करण्यात आल्या. गेल्या चार वर्षात मुलांना मोफत शिक्षण देण्यात आलं. मात्र हेच शिक्षण आता महाग झालं आहे. यावर्षीपासून पालकांना प्रतिमाह 1 हजार रुपये शैक्षणिक शुल्क लावणार असल्याची घोषणा मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी केली. मात्र त्याला आता विरोध होत आहे. हे शुल्क भरायचं कसं, असा प्रश्न यानिमित्तानं पालकाकडून विचारण्यात आला.
चार वर्षात मिळाला चांगला प्रतिसाद : शहरी भागातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी महापालिकांच्या शाळा कार्यरत आहेत. चार वर्षांपूर्वी आस्तिक कुमार पांडेय यांनी मनपा शाळेतील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, यासाठी सीबीएससी अभ्यासक्रमाची शाळा सुरू केली. पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद मिळाल्यानं दुसऱ्या वर्षी शाळांची संख्या वाढवण्यात आल्या. आजघडीला सीबीएससी अभ्यासक्रमाच्या सहा शाळा सुरू आहेत. ज्यामधे जवळपास आठशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आपल्या मुलांना मोफत चांगलं शिक्षण मिळत असल्यानं पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. महानगर पालिकेच्या वतीनं शिक्षण मोफत देण्यात आलं. पुस्तक आणि गणवेश पालकांना विकत घ्यावा लागत होता. आधुनिक अभ्यासक्रम नाममात्र दरात मिळत असल्यानं पालकांनी आनंद व्यक्त केला. मात्र या वर्षी पालकांना अचानक एक हजार रुपये प्रतीमहिना भरण्यास सांगण्यात आल्यानं पालकांनी रोष व्यक्त केला. परिस्थिती नसल्यानं पैसे भरायचे कसे, असा प्रश्न उपस्थितीत करत पालकांनी महापालिकेसमोर आंदोलन केलं.
नियम बदलल्यानं लागणार शुल्क : महापालिकेनं गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी सर्वसुविधा असलेली शाळा सुरू केली. मोफत शिक्षण देण्यात येत असताना पुस्तक आणि गणेवश खरेदीसाठी पालकांना फक्त 3 हजार रुपयांचा खर्च लागत होता. मात्र यावर्षी पासून 1 हजार रुपये पालकांना शैक्षणिक शुल्क भरावे लागतील, असे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. त्यामुळे पालकांमध्ये नाराजी निर्माण झाली. मात्र "नियमांमध्ये बदल झाल्यानं शुल्क आकारण्यात आले," अशी माहिती मनपा प्रियदर्शनी सीबीएससी शाळेचे मुख्याध्यापक संजु सोनार यांनी दिली. "पहिले मनपा मराठी शाळेतील शिक्षक नवीन इंग्रजी अभ्यासक्रम शिकवत होते. मात्र नवीन नियमानुसार सीबीएससी अभ्यासक्रम शिकवण्यासाठी वेगळे शिक्षक नियुक्त करावे लागले आहेत. प्रत्येक वर्गात साधारणतः 30 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्यासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना जवळपास 28 हजार रुपये पगार दिला जात आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च त्यांच्याकडूनच घेण्यासाठी, हे शुल्क आकारण्यात आले आहेत. शिक्षकांचा पगार आणि इतर खर्च असे प्रतिकक्षा 30 हजार रुपये लागणार आहेत. त्यामुळेच एक हजार रुपये दर आकारून नफा न तोटा तत्वावर ही शिक्षण दिले जात आहे," असं मुख्याध्यापक संजू सोनार यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- भाडेकरूला काढण्यासाठी वृद्ध दाम्पत्याचं मुन्नाभाई स्टाईल आंदोलन, पाहा काय आहे प्रकार? - Sambhajinagar Crime News
- धक्कादायक! लाडक्या कुत्र्याला आईनं मारलं म्हणून बालकानं केली आत्महत्या - Chhatrapati Sambhajinagar Crime
- लग्न करुन देत नाही म्हणून दोन भावांनी बापाला संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना - brothers killed father