कोल्हापूर Carried Old Man In Plastic Basket : अर्धांगवायूचा झटका आलेल्या वृद्धाला रस्ता नसल्यानं रात्रभर घरीच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रात्रभर घरी ठेवल्यानंतर सकाळी या वृद्धाला बांबूच्या डोलीतून उपचारासाठी नेण्यात आलं. त्यामुळे या वृद्धाला उपचाारविना कुढत रात्र काढावी लागली. नवलू कस्तुरे असं या डोलीतून रुग्णालयात नेण्यात आलेल्या वृद्धाचं नाव आहे. ही घटना चंदगडमधील बुजवडे इथल्या धनगरवाड्यात घडली आहे. घनदाट जंगल आणि जंगली प्राण्यांचा वावर असून या वाड्यावर रस्ताचं नसल्याचा फटका नवलू कस्तुरे यांना बसला.
वृद्धाला आला अर्धांवायूचा झटका : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देखील वृद्धाला उपचारासाठी टोपलीतून ( डालग्यातून ) नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील बुजवडे धनगर वाड्यावरील ही धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. बुजवडे धनगर वाड्यावरील नवलू कस्तुरे यांना रविवारी रात्री अर्धांग वायूचा झटका आला. मात्र धनगर वाड्यावरुन रुग्णालयाकडं जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं त्यांना रात्रभर घरीच ठेवावं लागलं. अखेर पहाटे जंगलातून पाच किलोमीटरची पायपीट करुन ग्रामस्थांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. वेळेत उपचार न मिळाल्यानं कस्तुरे यांना अत्यावश्य परिस्थितीत रुग्णालयात दाखल करावं लागलं. कोल्हापुरातील ग्रामीण भागात अजूनही अनेक धनगर वाड्या आहेत. मात्र तिथं मूलभूत सुविधा अद्यापही पोहोचलेल्या नाहीत. विशेषतः पावसाळ्यात या धनगर वाड्यावरील ग्रामस्थांना मरण यातना सहन कराव्या लागतात. धनगर वाड्यावर मतदार कमी आहेत. साक्षरता कमी असल्यानं लोकप्रतिनिधी आमच्याकडं दुर्लक्ष करत आहेत का? असा संतप्त सवाल या निमित्तानं नागरिकांनी विचारला.
रस्त्याचा प्रस्ताव दिला मात्र लाल फितीत अडकला : चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, आमदार पाटील यांनी विधानसभा मतदारसंघातील धनगर वाड्या संदर्भातला रस्त्यांचा प्रस्ताव यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागानं जिल्हाधिकारी कार्यालयाकडं दिला आहे. मात्र वडिलोपार्जित शेती आणि घर असल्यामुळे सुमारे 300 ते 400 लोक वस्ती असलेल्या धनगर वाड्यावरील नागरिक या ठिकाणाहून स्थलांतर करण्यास तयार नाहीत. त्यामुळे अशा अडचणी निर्माण होत आहेत. मात्र वनविभागाशी संपर्क साधून धनगर वाड्यावरील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे, असं आमदार राजेश पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
हेही वाचा :