मुंबई PARIS OLYMPICS 2024 NEWS: सध्या संपूर्ण जगभरात पॅरिस ऑलिम्पिकच्या चर्चा सुरू आहेत. कुठला देश किती पदक जिंकणार, याकडं क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलं आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रदेखील मागं नाही. महाराष्ट्रातून एकूण पाच खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे मध्य रेल्वेचे दोन खेळाडू स्वप्नील कुसळे आणि अंकिता ध्यानी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. हे दोघंही पुणे आणि मुंबई विभागात कमर्शियल कम तिकीट क्लर्क म्हणून कार्यरत आहेत.
नेमबाज स्वप्नील कुसळे : मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, या दोन खेळाडूंमधील स्वप्नील कुसळे हे महाराष्ट्रातील क्रीडा नेमबाज आहे. तो, मध्य रेल्वेच्या पुणे मंडळात कार्यरत आहेत. स्वप्नील यांनी 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. यापूर्वी 2022 मध्ये त्यांनी 22 ऑक्टोबर रोजी इजिप्तमधील कैरो इथं झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये चौथ्या स्थानासह पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3-पोझिशन स्पर्धेत ऑलिम्पिक कोटा बर्थ जिंकला होता. 2023 मध्ये चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धा, 2022 मध्ये बाकू येथील विश्वचषक आणि 2021 मध्ये नवी दिल्ली इथं नेमबाजीत स्वप्नील हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. याशिवाय त्यांनी 2015 ते 2023 या कालावधीत विविध नेमबाजी स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदकं जिंकली आहेत.
खेळाडू अंकिता ध्यानी : मध्य रेल्वेच्या दुसऱ्या खेळाडू अंकिता ध्यानी या उत्तराखंड येथील रहिवासी आहेत. त्या मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये कर्मचारी आहेत. अंकिता या एक धावपटू असून त्या मध्यम आणि लांब अंतराच्या क्रीडा प्रकारातील स्पर्धक आहेत. अंकिता या महिलांच्या 5000 मीटर स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. अंकिता यांनी आत्तापर्यंत 26 व्या राष्ट्रीय फेडरेशन कप वरिष्ठ अॅथलेटिक्स, 17व्या, 18व्या आणि 19व्या फेडरेशन कप ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आणि 33व्या, 34व्या, 35व्या आणि 36व्या राष्ट्रीय ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकं जिंकली, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.
मध्य रेल्वेचे हे दोनही कर्मचारी अत्यंत मेहनती : मध्य रेल्वेच्या दोन्ही खेळाडूंना पॅरीस ऑलम्पिकमध्ये सहभागी झाल्याबद्दल मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मध्य रेल्वे आणि भारतीय रेल्वेसाठी ही अभिमानाची बाब असल्याचं यादव यांनी म्हटले आहे. "आपले खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ऑलिम्पिक खेळांसाठी मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक असते. अत्यंत कठोर परिश्रम, जिद्द आणि जीवनात शिस्त लागते. मध्य रेल्वेचे हे दोनही कर्मचारी अत्यंत मेहनती आहेत. या स्पर्धेसाठी त्यांना मध्य रेल्वे परिवाराकडून शुभेच्छा देत आहोत", असं महाव्यवस्थापक यादव यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा