हैदराबाद Parakram Divas 2024 : भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात नेताजी सुभाषचंद्र बोस हे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहलं गेलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्रमुख भूमिका निभावली आहे. सुभाषचंद्र बोस यांना आदरानं 'नेताजी' असं म्हटलं जाते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. त्यामुळंच 23 जानेवारी हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन देशभरात पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. देशभरातील नागरिक नेताजींच्या जयंतीला त्यांना आदरांजली अर्पण करतात. मात्र अगोदर हा दिवस 'देश प्रेम दिवस' म्हणून साजरा करण्यात येत होता.
नेताजींचा जन्मदिन पराक्रम दिवस : देशभरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारानं प्रेरणा घेतलेले लाखा तरुण कार्यरत आहेत. त्यामुळंच त्यांचा जन्मदिन पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचं 2021 मध्ये जाहीर केलं आहे. आता पश्चिम बंगाल सरकारनं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस देशप्रेम दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. नागरिकांमध्ये देशभक्ती जागृत करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस देश प्रेम दिवस म्हणून साजरा करण्यासाठी हा प्रस्ताव देण्यात आला होता. नेताजींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मोठ्या धैर्यानं कार्य केलं आहे. त्यांनी देशसेवेचा नवा मापदंड घालून दिला. त्यामुळं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर तरुण जीव ओवाळून टाकत असल्याचं दिसून येते.
कशी झाली पराक्रम दिवसाची सुरुवात : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 124 व्या जयंतीदिनी केंद्र सरकारनं 2021 मध्ये पराक्रम दिन साजरा करण्याचं जाहीर केलं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं 23 जानेवारी 2021 ला देशभरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिन म्हणून साजरी करण्यात आली. देशभरात 23 जानेवारीला विविध कार्यक्रमाचं आयोजन करुन नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं जीवन : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 मध्ये ओडिशातील कटक इथं झाला होता. जानकीनाथ बोस आणि प्रभावती दत्त या दाम्पत्याला 14 अपत्य होते. त्यात सुभाषचंद्र बोस हे नववं अपत्य होते. त्यांचे वडील सुप्रसिद्ध वकील होते. सुभाषचंद्र बोस हे लहानपणापासूनचं प्रचंड देशभक्त होते. तत्कालिन कलकत्ता आणि आत्ताचं कोलकाटा इथल्या स्कॉटिश चर्च महाविद्यालयात आणि प्रेसिडेन्स महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं आहे. मात्र त्यांनी महाविद्यालयात केलेल्या कृत्यांमुळं त्यांना 1916 मध्ये महाविद्यालयातून काढून टाकण्यात आलं होतं. 1919 मध्ये सुभाषचंद्र बोस हे पदविधर झाले.
सुभाषचंद्र बोस झाले आयसीएस उत्तीर्ण : सुभाषचंद्र बोस हे प्रचंड देशभक्त होते, तसेच ते अभ्यासातही हुशार होते. भारतीय नागरी सेवेचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या पालकांनी त्यांना इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात पाठवलं. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी 1920 मध्ये नागरी सेवा परीक्षा पास केली. मात्र भारतात सुरू असलेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एप्रिल 1921 मध्ये भारतात धाव घेतली. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी तन-मन-धनानं देशसेवेत झोकून काम केलं.
स्वातंत्र्य चळवळीत काम : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य चळवळीत काम करायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी भारतीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आझाद हिंद फौजेच्या स्थापनेत महत्वाचं योगदान दिलं. आझाद हिंद फौजेनं केलेल्या कार्यामुळं इंग्रजांच्या उरात धडकी भरली. सुभाषचंद्र बोस यांनी 3 मे 1939 ला फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला. त्यामाध्यमातून त्यांनी देशभक्त तरुणांची फौज उभी केली. जुलै 1943 ला सिंगापूरवरुन परत येताना आझाद हिंद सेनेनं त्यांना 'नेताजी' या पदवीनं गौरवलं. त्यानंतर एका विमान दुर्घटनेत नेताजींचा करुण अंत झाला. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती त्यानिमित्त त्यांना ईटीव्ही भारतकडून विनम्र अभिवादन.