नाशिक Padmashri Uday Deshpande : महाराष्ट्रातील मुलांमध्ये ताकद असून, अशा मुलांना योग्य प्रशिक्षण दिल्यास ते मल्लखांब खेळात भारताचं नाव उंचावतील, असं मत पद्मश्री पुरस्कार विजेते उदय देशपांडे यांनी व्यक्त केलंय. केंद्र सरकारचा मानाचा 'पद्मश्री पुरस्कार' जाहीर झाल्यानंतर एका कार्यक्रमासाठी ते नाशिकमध्ये आले असता त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला.
उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर : मल्लखांबाचे प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. 'मल्लखांबाचे जनक' म्हणून उदय देशपांडे यांना ओळखलं जातं. त्यांनी हा खेळ जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. केंद्र सरकारनं गुरुवारी पद्म पुरस्कारांची घोषणा केलीय. यावेळी 132 मान्यवरांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. यापैकी 5 जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण, 110 जणांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात येणार आहे.
5 हजारांहून अधिक जणांना प्रशिक्षण : उदय देशपांडे यांनी आतापर्यंत 50 देशांतील 5 हजाराहून अधिक खेळाडूंना प्रशिक्षण दिलं आहे. त्यांनी मल्लखांबाची ओळख आदिवासी, अनाथ, अपंग, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींना करून दिली. उदय देशपांडे यांनी या खेळासाठी नियमांचं पुस्तकही तयार केलंय. खेळातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल वयाच्या 70 व्या वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. जागतिक मल्लखांब महासंघाचे संचालक म्हणूनही त्यांनी या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
महाराष्ट्र सरकारनं प्रचार, प्रसार करावा : ज्याप्रमाणे मध्यप्रदेश सरकारनं मल्लखांबाला राज्य खेळाचा दर्जा दिला आहे, त्याचप्रमाणं महाराष्ट्र सरकारनं मल्लखांबाच्या खेळाचा प्रचार-प्रसार करावा, महाराष्ट्रातील आदिवासी खेळाडू अनेक खेळांमध्ये योगदान देत आहेत, अशा मुलांमध्ये जिद्द. चिकाटी असते. त्यांना चांगलं प्रशिक्षण दिल्यास ते देशाचं नाव उज्वल करतील, तसंच ते आंतरराष्ट्रीय स्तरावर मल्लखांब खेळतील, असा विश्वास पद्मश्री उदय देशपांडे यांनी व्यक्त केलाय.
एकाग्रता, प्रतिकारशक्ती वाढवणारा खेळ : एका लाकडी खांबावर खेळल्या जाणाऱ्या मल्लखांब खेळाचे अनेक फायदे आहेत. या खेळामुळं कमी वेळात शरीराच्या अंतर, बाह्य अवयवांचा चांगला व्यायाम होतो. या खेळातून मुलांची एकाग्रता, चिकाटी, आत्मविश्वास, संयम यातून हे खेळाडू इतर खेळात प्राविण्य मिळवत असल्याचं पद्मश्री उदय देशपांडे यांनी सांगितलं.
नाशिकमध्ये मल्लखांबाची सुरुवात : मल्लखांबाची सुरुवात सुमारे दोनशे वर्षांपूर्वी नाशिकच्या कोठुरे गावचे बाळभट्ट देवधर यांनी सप्तश्रृंगी किल्ल्यावर केली होती. नाशिक मल्लखांब खेळाचं जन्मस्थान आहे. नाशिकमध्ये सुरू झालेला हा खेळ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. नाशिकमधील यशवंत व्यायामशाळा ही जवळपास 106 वर्षे जुनी व्यायामशाळा आहे. ज्यामध्ये अनेक कुस्तीपटूंना प्रशिक्षण दिलं जातं. मल्लखांब, कुस्ती तसंच विविध खेळ या व्यायामशाळेत शिकवले जातात. या ठिकाणी नगर जिल्ह्यातील अनेक तरुण-तरुणी खेळण्यासाठी येतात. आतापर्यंत हजारो मुलांनी मल्लखांबाचं प्रशिक्षण घेतलं आहे.
हे वाचलंत का :