अमरावती Orphan Marriage In Amravati : मानवी जीवनात सोळा संस्कारातील एक गोड संस्कार म्हणजे 'विवाह' असतो. त्यामध्ये दोन कुटुंब जोडली जातात. दोन मने एक होतात. त्यामुळंच विवाहाला कर्तव्यही समजलं जातं. अनाथांच्याही वाट्याला हा क्षण यावा आणि आपणही त्याचे साक्षीदार व्हावे, या उद्दात हेतूनं सामजिक बांधिलकी जपत अडगुलकर दाम्पत्यांनी 11 कन्यांचा विवाह करण्याचा संकल्प केला. त्यातल्या दोन कन्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय. तळ हाताच्या फोडाप्रमाणं जपलेल्या लेकी आज 'सदाशांती बालगृहातून' त्यांच्या हक्काच्या घरी जात असल्याचं समाधान इंगळे दाम्पत्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
३२ वर्षापूर्वी रोवली गेली सदाशांतीची मुहूर्तमेढ : डॉक्टरची पदवी घेतलेल्या डॉ. इंगळे आणि त्यांच्या पत्नीनं आपण अनाथांचे नाथ होऊन समाजसेवा करण्याचं व्रत ३२ वर्षापूर्वीच घेतलं होतं. बहुद्देशीय आरोग्य आणि समाजकल्याण संस्थेची स्थापना करून 'सदाशांती' या नावानं बालगृह सुरू केलं. बालगृहात बालपण आई-वडिलांच्या प्रेमाविना करपलेले, ज्यांना या जगात कुठेच आधार नाही, अशा चिमुकल्या मुलींना मायेचा हात येथे दिला जातो. त्यांच्या जगण्यासाठी आधार देण्याचं आणि त्यांच्यात नवीन उमेद निर्माण करण्याचं कार्य 'सदाशांती बालगृह' करत आहे. डॉ. एस.पी. इंगळे आणि कुमुदिनी इंगळे या दाम्पत्यानं मोठ्या कष्टानं चिमुकल्या मुलींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं कार्य आतापर्यंत यशस्वीपणे केलंय.
१८ वर्ष पुर्ण झालेल्या मुलींसाठी सुरू केलं आधारगृह : वयाची १८ वर्ष झाल्यानंतर मुलींना बालगृहात ठेवण्यास शासन परवानगी देत नाही. त्यामुळं अशा मुलींच्या आयुष्याचं पुढे काय? म्हणून सामजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून अशा मुलींकरिता संस्थेनं आणखी या पुढची जबाबदारी स्वीकारत १ जानेवारी २०२३ पासून १८ वर्षावरील मुलींकरिता 'सदाशांती आधारगृह' सुरू केले. हे आधारगृह या मुलींचं संगोपन, शिक्षण, कौशल्य विकास, पुर्नवसन आणि लग्न हे उद्दिष्ट ठेवून विनामूल्य कार्यरत आहे. मुलींनी स्वतःच्या पायांवर उभे राहावं यासाठी विविध कौशल्ये विकसित करण्याचं काम संस्थेकडून सातत्यानं सुरू आहे. या कामात असंख्य दानदाते निःस्वार्थपणे मदत करत आहेत. 'सदाशांती बालगृह' आणि 'सदाशांती आधार केंद्र' हे यशस्वीपणे चालविण्यासाठी संजय पळसोदकर, प्रा. डॉ. पंकजा इंगळे, डॉ. जयेश इंगळे या संचालक मंडळासह येथील कर्मचारीवर्ग कार्यरत आहेत.
अडगुलवार दाम्पत्याने केले कन्यादान : समाजसेवक राजु अडगुलवार आणि स्वाती अडगुलवार या दाम्पत्यानं त्याचं कन्यादान केलं. या विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वरवधुला आर्शिवाद दिला. 'सदाशांती आधार गृहातील' रूपालीचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील सारोळा मारुती येथील किशोर ढगे याच्याशी झाला. तर सपनाचा विवाह अकोला जिल्ह्यातील अंबाशी येथील योगेश टाले या युवकाशी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे पार पडला. विवाह सोहळ्याला आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि पोलीस आयुक्त डॉ. नविनचंद्र रेड्डी सपत्नीक उपस्थित झाले होते.
हेही वाचा -
- साईनगरीत सामुदायिक विवाह सोहळ्यात 41 जोडपे विवाहबद्ध; 24 वर्षांपासून कोते दाम्पत्य करतंय आयोजन - marriage ceremony
- उच्चशिक्षित तरुणीनं स्वतःच्या लग्नाचं वऱ्हाड नेलं बैलगाडीतून, गावाची खंडित परंपरा केली सुरू - bride carry bullock cart
- प्रेमाला नाही वयाचे बंधन! इन्स्टाग्रामवरच्या ओळखीतून अमरावतीच्या 34 वर्षीय महिलेचा 80 वर्षीय पुरुषाबरोबर विवाह - Instagram Love Story