नाशिक Onions Smuggling : केंद्र सरकारनं सध्या कांद्यावर निर्यातबंदी लादली आहे. परंतु भारतीय कांद्याला दुबई, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया या देशातून असलेली मोठी मागणी पाहता काही निर्यातदार छुप्या मार्गानं डाळिंब, द्राक्ष, टोमॅटोच्या बॉक्समधून कांद्याची तस्करी करत आहेत. (Onion Export Association) त्यात सहभागी निर्यातदार आणि तस्करांना एका कंटेनरमागे 15 ते 16 लाख रुपये निव्वळ नफा मिळत आहे; मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीही आर्थिक फायदा होत नसल्यानं याबाबत ग्राहक मंत्रालय तसंच कस्टम विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं कांदा निर्यात सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा निर्यात संघटनेनं केली आहे.
त्याची काळजी केंद्र सरकारनं घ्यावी : देशात कांद्याची टंचाई होऊ नये, यासाठी केंद्र सरकारनं गेल्या काही महिन्यांपासून कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे; त्यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत, अशी भावना शेतकऱ्यांची असून या विरोधात अनेकदा विरोधी पक्ष तसंच शेतकरी रस्त्यावर उतरले; मात्र कांदा निर्यातबंदी उठवण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. दुसरीकडे भारताच्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त असतानाही कांदा छुप्या मार्गानं परदेशात पाठवला जात आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर देशाची बदनामी होत आहे. परदेशातील कांद्याचा ग्राहक इतर देशातील व्यापाऱ्यांकडे जाऊ नये आणि भारतीय कांद्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर परिणाम होऊ नये याची काळजी केंद्र सरकारनं घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा निर्यात संघटनेनं सरकारला निवेदनाद्वारे केली आहे.
सरकारनं निर्यात सुरू करावी : निर्यातबंदी असतानाही परदेशात कांदा तस्करी होत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना तसंच स्थानिक ग्राहकांना देखील होत नाही; त्यामुळे केंद्र सरकारनं त्वरित निर्यात सुरू करून दोन पैसे शेतकऱ्यांना मिळतील याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष अजित शहा यांनी केली.
कांद्याची 200 रुपयानं विक्री : कांदा निर्यातबंदी झाल्यापासून मागील दोन महिन्यांपासून कांदा तस्करी सुरू आहे. यामुळे परदेशातील नियमित कांदा खरेदीदार विचारात पडला आहे. भारतात कांदा बंदी असतानासुद्धा कांदा आमच्याकडे येत आहे. यामुळे भारताची प्रतिमा खराब होत आहे. या कांदा तस्करांवर सरकारनं कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. भारतातील शेतकरी 8 ते 10 रुपये किलोने कांदा विकत आहे आणि हा कांदा तस्कर बाहेरील देशात दोनशे रुपये किलोनं विक्री करत असून मोठा फायदा मिळवत आहे; त्यामुळे सरकारनं याकडे लक्ष देण्याची गरज असून निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा निर्यातदार संघटनेचे पदाधिकारी विकास सिंग यांनी केली आहे.
हेही वाचा: