मुंबई - World Yoga Day : आज संपूर्ण देशभरात जागतिक योग दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबईत देखील महानगर पालिकेकडून जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रसिद्ध फॅशन डिझायनर व सामाजिक कार्यकर्ती शायना एनसी, प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी योग करत निरोगी आरोग्याचा संदेश दिला. योग हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. आज संपूर्ण जग योगाचं महत्त्व समजून घेत आहे. संपूर्ण जगात योग दिवसाला सुरुवात झाली त्या जागतिक जागतिक योग दिनाला आता दहा वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी योग दैनंदिन जीवनात दररोज करून आपले आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी राखण्याचा संदेश दिला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यावर्षी 'योगा बाय द बे' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथे सकाळी साडेसहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी मुंबईकरांशी संवाद साधताना अभिनेता जॅकी श्रॉफ म्हणाले की, "माझं घर इथून जवळच आहे. माझं बालपण याच भागात गेलं. माझ्या भावाचा मृत्यू देखील याच भागात झाला. त्यामुळे या जागेशी माझे भावनिक नातं आहे." यावेळी जॅकी श्रॉफ यांनी चित्रपट सृष्टीत येण्याआधीच्या आपल्या सुरुवातीच्या दिवसातील एक आठवण देखील मुंबईकरांबरोबर शेअर केली. ते म्हणाले की, "शायना एनसी यांच्या वडिलांचा एक राजकीय पक्ष होता. स्वतंत्र पार्टी असं त्या पक्षाच नाव होत. मी त्या पक्षाचा कार्यकर्ता होतो. त्यांच्या पक्षाचे पोस्टर लावणे ते घरोघरी वाटणे ही कामे मी तेव्हा केली आहेत."
पुढे बोलताना अभिनेता जॅकी श्रॉफ म्हणाले की, "त्यावेळी पोस्टर चिकटवण्याचे पैसे मिळायचे. पोस्टर चिकटवण्याच्या कामापासून सुरू झालेला माझा प्रवास, आज मी तुमच्यासमोर उभा आहे. बाबा लोक (राजकीय नेते) आजही मला त्यांच्या कार्यक्रमांसाठी बोलवतात. मी याच भागाचा मुलगा आहे. शायना एनसी यांच्या वडिलांच्या प्रत्येक सभेला मी उपस्थित राहायचो. त्यांनी केलेल्या प्रत्येक सामाजिक कार्यात मी गेलेलो आहे. त्यांच्या वडिलांकडून मला प्रेम मिळालं." अभिनेता जॅकी श्रॉफ मुंबईकरांशी संवाद साधत असतानाच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी जोरजोरात हॉर्न वाजवले यावर जॅकी श्रॉफ यांनी आपल्या खास शैलीत वाहतुकीचं नियम पाळण्याची देखील संदेश दिला. "योग करा, स्वस्थ रहा. वाहतुकीचे नियम पाळा. विनाकारण हॉर्न वाजवू नका. शांतता राखा. स्वच्छता राखा." असा संदेश यावेळी जॅकी श्रॉफ यांनी दिला.
हेही वाचा -
प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी, अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Anupam Kher
सनी देओल आणि दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी मिळून साकारणारा 'बिग बजेट अॅक्शन' चित्रपट - Sunny Deol film