छत्रपती संभाजीनगर Bengaluru Cafe Bomb Blast Case : बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील दोन मुख्य संशयितांच्या संपर्कात शहरातील तीन तरुण असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणी एनआयएकडून छत्रपती संभाजीनगरातील तीन तरुणांची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या पथकानं हर्सूल परिसरातील या तरुणांची कसून चौकशी केली. त्यात त्यांच्या घराची झाडाझडती घेऊन लॅपटॉप, मोबाईलसह ते वापरत असलेले अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
बॉम्बस्फोटातील आरोपीच्या होते संपर्कात? : 1 मार्चला बंगळुरू येथील रामेश्वर कॅफे इथं बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. या प्रकरणी संशयित असलेल्या दहशतवादी अब्दुल मतीन आणि मुसव्वूर हुसेन शाजीब यांच्याशी संभाजीनगर इथल्या मयूर पार्कचे तीन युवक संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. 1 मार्चला बंगळुरूमधील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट होऊन 11 जण गंभीर जखमी झाले होते. आयईडी टायमर वापरुन हा बॉम्बस्फोट करण्यात आला होता. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून ते संशयितांच्या संपर्कात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यानुसार त्यांचे व्यवहार तपासणी करण्यासाठी एनआयए पथक शहरात दाखल झाले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तीन युवकांची झाली चौकशी : बॉम्बस्फोटात संशयित असलेल्या अब्दुल मतीन आणि मुसाविर हुसैन शाजिब यांच्या सोबत क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून संपर्क आल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी केंद्रीय तपास यंत्रणेचे पथक शहरात दाखल झाले. मयूर पार्क येथे राहत असलेल्या तिघांची त्यांनी जवळपास आठ तास कसून चौकशी केली. शहरात राहणारे तिघंही एकमेकांचे मित्र असून स्फोटातील आरोपी यांना ते ओळखत नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्याकडं असलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर कागद पात्रांची त्यांनी तपासणी केली. त्यावेळी त्यांना पुन्हा चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. जवळपास 8 तास चौकशीनंतर नोटीस बजावून पथक रवाना झालं. याआधी याच भागातून एका युवकाला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा याच भागातील तिघांची चौकशी झाल्यानं शहरात दहशतवादाची पाळंमुळं रुजली आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा :