नवी मुंबई Girl Found Murdered : एकतर्फी प्रेमातून नवी मुंबई नजीकच्या उरण शहरात राहणाऱ्या 20 वर्षीय यशश्री शिंदे हिच्या खून प्रकरण राज्यभर गाजलं. ही घटना ताजी असतानाच बुधवारी संध्याकाळी नवी मुंबईतील सीवूडसमध्ये आणखी एका 20 वर्षीय तरुणीचा तिच्या प्रियकरानं गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाविका मोरे असं या घटनेतील मृत तरुणीचं नाव आहे. प्रेयसीचा खून करुन प्रियकरानं तिचा मृतदेह डीपीएस लगतच्या तलावात टाकून दिल्यानं नवी मुंबईत दहशत पसरली आहे. प्रेयसीचा गळा आवळल्यानंतर प्रियकरानं देखील आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
काय आहे प्रकरण : नवी मुंबईतील सिडवूड सेक्टर 48 इथं राहणारी भाविका मोरे (20) असं तरुणीचं नाव असून तिचे पनवेल तालुक्यातील पेंधर गावातील स्वस्तिक पाटील (22) या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. स्वस्तिक यानंच भविकाचा गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वतः देखील तिथल्या तलावात उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार एनआरआय पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
बुधवार संध्याकाळी भाविकाचा आढळला मृतदेह : बुधवारी संध्याकाळी नवी मुंबईतील सिवूड्स इथल्या डीपीएस लगतच्या तलावात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना भाविका मोरेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मच्छीमारांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच एनआयआर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भविकाचा मृतदेह ताब्यात घेतला. प्रथमदर्शनी भविका हिचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं आढळून आलं. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे एनआयआर पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले दोघं : भाविकाचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये मृत भाविका आणि तिचा प्रियकर स्वस्तिक पाटील हे दोघंही संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास बाईकवरुन सिवूड्स इथल्या डीपीएस लगतच्या तलावाच्या दिशेनं जाताना आढळून आले. मात्र पुन्हा स्वस्तिक पाटील परत येताना आढळून आला नाही. त्यामुळे भाविकाची हत्या केल्यानंतर त्यानं देखील तलावात उडी मारल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे तलाव खाडीला लागून असल्यामुळे त्याचा मृतदेह खाडीत वाहून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बेपत्ता स्वस्तिक पाटील याचा पोलीस शोध घेत आहेत.
दोघात भांडण झाल्यामुळे केली असावी हत्या : नवी मुंबईतील सिवूड्स इथं राहणारी भाविका मोरे हिचे पनवेल तालुक्यातील पेंधर इथल्या स्वस्तिक पाटील याच्यासोबत प्रेमसंबंध होते. हे दोघंही बुधवारी संध्याकाळी सीवूड्स इथल्या डीपीएस तलावालगत आल्यानंतर त्या दोघांमध्ये भांडण झालं असावं, असा पोलिसांना संशय आहे. मात्र आता दोघंही नसल्यानं त्यांच्यात नेमकं कोणत्या कारणावरुन भांडण झालं, हे सांगणे कठीण असल्याचं पोलिसांनी सांगितलं. एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हेही वाचा :
- उरण तरुणी हत्याकांड ; फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बोलावलं भेटीला, अन् मग तिनं लग्नास नकार देताच निर्घृणपणे भोसकलं - Uran Girl Murder Case
- उरण तरुणी हत्याकांड प्रकरण : आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकात ठोकल्या बेड्या - Uran Girl Murder Case
- एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून : प्रेमाला नकार दिल्यानं नराधमानं घरात घुसून तरुणीला भोसकलं - Girl Stabbed To Death