नागपूर Uttamrao Jankar : गेल्या काही दिवसांपूर्वी माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न चिघळला आहे. आज सोलापूरचा प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते उत्तमराव जानकर हे आज (15 एप्रिल) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नागपूरला आले होते. त्यांच्यासोबत भाजपा नेते जयकुमार गोरे, रणजित निंबाळकर आणि शहाजीबापू पाटील देखील होते. महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढवत असताना अनेक अडचणी कार्यकर्त्यांसमोर येत आहेत. त्या सर्वांचं निराकरण देवेंद्र फडणवीस नागपुरात बसून करत आहेत.
आज संध्याकाळी निर्णय घेऊ - उत्तम जानकर : माढा आणि सोलापूर लोकसभेचा विषय होता. आज देवेंद्र फडणीस यांना भेटण्यासाठी आम्ही नागपूरला आलो होतो. जवळपास एक तास चर्चा झाली. त्यामध्ये आम्ही आमच्या अडचणी आणि समस्या देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडल्या आणि आज त्यावर चांगली सकारात्मक चर्चा झाली. आता आमचे सर्व प्रमुख नेतेमंडळी एकत्र बसून आम्ही निर्णय घेणार आहे. आज ज्या विषयावर चर्चा झाली ते सगळे आमच्या कार्यकर्त्यांसमोर मांडून सायंकाळी निर्णय घेऊ असं उत्तम जानकर म्हणाले. लोकसभा तिकिटाचा विषय केव्हाचं संपलाय; परंतु इतर काही घडामोडी घडत आहेत. गेल्या दहा वर्षांत अनेक अडचणी आणि इतर विषयसुद्धा आहेत. त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली असल्याचं ते म्हणाले.
आता सर्व अडचणी दूर झाल्या आहेत - रणजित निंबाळकर : उत्तमराव जानकर हे आमचे चांगले मित्र आहेत. ते माझ्यावर कधीच नाराज नव्हते. सातत्याने ते माझ्याशी संपर्कात होते. आजच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा होऊन तोडगा निघाला आहे. उद्या ज्यावेळी ते फॉर्म भरतील तेव्हा देवेंद्र फडणवीस देखील सोबत असतील असं रणजित निंबाळकर म्हणाले.
अपेक्षेपेक्षा जास्त प्रश्न सोडवले - शहाजीबापू : उत्तम जानकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत. भाजपाबद्दल त्यांची काही नाराजी, अडचणी होत्या. उत्तम जानकर आणि कार्यकर्त्यांनी मोहिते पाटील यांच्या सारख्या मोठ्या राजकीय प्रस्थ असलेल्या घराण्याच्या विरोधात तीस वर्षे काम केलं. मात्र, त्यांना राजकारणात समाधानकारक यश आलं नाही. त्यामुळे उत्तम जानकरांची नाराजी होती. किंबहुना त्यांना मानणारे तळागाळातील लोकही नाराज आहेत. यासर्व विषयावर सकारात्मक चर्चा झाली आहे. किंबहुना उत्तम जानकरांच्या अपेक्षेपेक्षासुद्धा जास्त देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे प्रश्न सोडवले, असा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.
शंभर टक्के नाराजी झाली दूर - जयकुमार गोरे : शंभर टक्के नाराजी दूर झाली आहे. या संदर्भात उत्तम जानकर संध्याकाळी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतील, असा दावा भाजपा नेते जयकुमार गोरे यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूरला येणार आहेत. माझं वैयक्तिक मत असं आहे फडणवीस यांच्यासोबत फॉर्म भरतेवेळी जानकर सोबत असतील. जे अपेक्षित होतं त्यावर चर्चा झाली आणि त्यातून मार्ग निघाला आहे.
हेही वाचा :
- 7 कुख्यात नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी ठोकल्या बेड्या; एकावर होतं 'इतकं' बक्षीस - Naxalite Arrested In Sukma
- कामावरुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; माती वाहणारा टिप्पर उलटून 5 जणांचा बळी - Bagalkot Accident
- सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबारात वापरलेली दुचाकी रायगडमधील, तर सुपारी 'या' कुख्यात गुंडानं घेतल्याचं उघड - Salman Khan Firing Case