नाशिक Mumbai Nashik Highway : मुंबई-नाशिक महामार्गवर मोठ्या प्रमाणत खड्डे पडले असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळं वाहतूक कोंडी होत असून नाशिक ते मुंबई प्रवासासाठी प्रवाशांना 7 ते 8 तासांचा वेळ लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी आणि तोपर्यंत वाहनधारकांकडून टोल आकारू नये. यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी 'घोटी टोल' नाक्यावर (Ghoti Toll Naka) आंदोलन करत नाशिक-मुंबई वाहतूक रोखून धरली होती.
मुंबई-नाशिक वाहतूक रोखली : गेल्या काही महिन्यांपासून नाशिक ते मुंबई रस्त्याने प्रवास करणं जिकरीचं झालं आहे. अशात कसारा ते पिंपळगाव बसवंत या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. तसंच अपघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. यासोबतच वाहतूक कोंडी होत असल्यानं नाशिक, मुंबई प्रवासासाठी तब्बल सात ते आठ तास वेळ लागत आहे. या अडचणीमुळं वाहनधारक हैराण झाले आहेत. टोल भरूनही रस्ते चांगले नसल्यानं वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे. याच विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने 'घोटी टोल' नाक्यावर आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तसंच काही गाड्या विनाटोल सोडून देत रस्ता काही काळ रोखून धरला होता. यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पुढील पंधरा दिवसांत रस्ता दुरुस्त झाला नाही तर वाहनधारकांकडून टोल आकारू नये अशी मागणी त्यांनी केलीय. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
ठाकरे सेना देखील आक्रमक : मुंबई-नाशिक महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळं छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत असून अनेकांचा नाहक बळी जात आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत. वाहनधारकांची मुंबईला जाताना अक्षरश: दमछाक होते. या सर्व घटनांना महामार्गाचे अधिकारीच जबाबदार आहेत. येत्या पंधरा दिवसात या रस्त्यांची संपूर्ण दुरुस्ती करावी, तोपर्यंत टोल नाके बंद ठेवावेत. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने दिला आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग कार्यालयावर धडक देत महामार्गाचे अधीक्षक यांना मागणीचे निवेदन सादर केले.
हेही वाचा -