कोल्हापूर Maharashtra Budget 2024 : "लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधानांनी राज्यात १८ ठिकणी सभा घेतल्या होत्या. परंतु सभा घेतलेल्या ठिकणी महायुतीच्या १४ उमेदवारांचा पराभव झाला. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी राज्यात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात," अशी खोचक टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. शुक्रवारी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच शरद पवार यांनीदेखील अर्थसंकल्पावर कोल्हापूर इथं पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली.
अर्थसंकल्पाबाबत गुप्तता ठेवण्यात आली नाही : "राज्याचा अर्थसंकल्प मांडताना एक दिवस आधीच अर्थसंकल्पातील अनेक गोष्टी बाहेर आल्या होत्या. अर्थसंकल्पाबाबत गुप्तता ठेवायला पाहिजे ती ठेवली नाही. ज्या तरतुदी केल्यात, त्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केल्या आहेत. हा अर्थसंकल्प लोकांना काहीतरी भयंकर करतोय असं दाखवणारा आहे. प्रत्यक्ष या योजनाची अंमलबजावणी कशी होते, त्यावर अवलंबून आहे. या अर्थसंकलपामुळे मोठ्या प्रमाणात कर्ज वाढणार असून जनतेला काय मिळालं?" असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार, हे जाहीर करण्याच्या मुद्द्यावरुन आपसात विसंवाद असल्याची साक्ष पटवणाऱ्या नेत्यांनाही पवारांनी एका वाक्यात शांत केलं. "विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रfपदाचा आमचा सामुदायिक चेहरा असेल," असा दावा पवार यांनी केला.
डाव्या विचारसरणीचे घटक आणि मोदी विरोधी सोबत घेणार : "लोकसभेला 48 पैकी 31 जागा आम्हाला मिळाल्या आहेत. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आमच्या सोबत कोण येणार, काही माहिती नाही. अद्याप तसा काही प्रस्ताव नाही. मात्र, लोकसभेसाठी राज्यात 18 ठिकाणी पंतप्रधान मोदींनी सभा घेतल्या होत्या. त्यातील जागा आम्हाला मिळाल्या. आता आगामी निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात. डाव्या विचारसरणीचे घटक आणि मोदी विरोधींना विधानसभेसाठी सोबत घेणार आहोत," असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. यातून त्यांनी विधानसभेला नव्या धोरणाबद्दल स्पष्ट संकेत दिले.
पुण्यातील घटनेबाबत भाष्य: "नव्या पिढीला व्यसनाधीन बनवण्यासाठी अनेक गोष्टींच्या विक्रीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढली. अपेक्षा आहे सरकार याची नोंद घेईल." उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्रिपदातून मुक्त करा, अशा घेतलेल्या भूमिकेवर बोलताना शरद पवार म्हणाले, "कोणाच्या मुक्ततेची घोषणा कोणी केली हे पाहण्यापेक्षा त्यांची संख्या किती कमी झाली, हे पाहणं गरजेचं आहे. लोकांनी आपल्याला स्पष्ट संकेत दिला नाही, ही कितीही गोष्ट त्यांनी लपवली, तरी लपणार नाही," असा टोलाही पवारांनी भाजपाला लगावला.
"राज्यातील रिक्त झालेल्या पाच विधान परिषदेच्या जागा आम्ही लढणार नसल्याचे सांगत केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला गेला. आम्ही यासंदर्भात लोकसभेत प्रश्न उपस्थित करणार आहोत. झालेल्या लोकसभेच्या निमित्तानं पहिल्यांदा लोकांची एकजूट पाहायला मिळत आहे. नीट परीक्षेतील गोंधळ सरकारला थांबवता आला नाही. अशा प्रश्नांवर केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारला घेरण्याचा आमचा प्रयत्न आहे," असंही पवार यावेळी म्हणाले.
जिल्हा अशा गोष्टीला भीक घालत नाही: सत्तेचा गैरवापर करून बिद्री येथील दुधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, "कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील यांच्याशी माझं काही बोलणं झालेलं नाही. ज्याची गरज देशाला आहे, तेच इथं तयार होतं. असं असताना छापे टाकणं योग्य नाही. सत्तेचा गैरवापर करुन हे छापे टाकून एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचं काम सरकार करत आहे. ही कारवाई कोल्हापुरात झाली मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात अशा गोष्टींना कोण भीक घालत नाही."
हेही वाचा
- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात सरकारकडून घोषणा अन् पैशांचा 'पाऊस' - maharashtra budget session 2024
- "चद्दर लगी फटने खैरात लगी बटने"; जयंत पाटीलांची अर्थसंकल्पावरुन मार्मिक टीका, पाहा व्हिडिओ - Jayant Patil on Budget
- अर्थसंकल्पात मोफत घोषणांचा पाऊस, पण वस्तुस्थिती काय? - Atul Londhe On Budget 2024