मुंबई : लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं असून कधीही निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. देशातील भाजपा आणि काँग्रेस पक्षाकडून लोकसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, जाहीर झालेल्या यादीवरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. जागा वाटपात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शरद पवार यांच्यासोबत असताना सन्मानाची वागणूक असायची असं म्हणत महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून अजित पवार यांच्यावर उपरोधिक टीका केली जात आहे.
अजित पवार यांना सन्मानजनक वागणूक : लोकसभा जागा वाटपात महायुतीचं सूत्र ठरत नाही आणि यातच अजित पवार यांच्या पक्षाला दिल्लीत चकरा माराव्या लागतात. शरद पवारांसोबत असताना अजित पवार यांना सन्मानाची वागणूक मिळत होती. मात्र, तो सन्मान त्यांनी घालवला असून 50 आमदार असतानाही तीन जागांवर समाधान मानावं लागत असल्याचं चित्र बरोबर नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांना उपरोधिक टोला लगावला आहे. तसंच, अजित पवारांबाबत अनेकवेळा संजय राऊत देखील गुणगान गाताना दिसतात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील अजित पवार यांना सन्मानजनक वागणूक, आणि महायुतीत काही बोलताना घुसमट होत असल्याचं म्हटलं होतं.
आपल्या कुवतीप्रमाणे बोला - सुरज चव्हाण : महाविकास आघाडीतील नेत्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर वारंवार उपरोधिक टीका केली जात आहे. आपल्या कुवतीप्रमाणे, उंचीप्रमाणे भाष्य करावं अशा प्रकारचा सल्ला देत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा प्रवक्ता सुरज चव्हाण यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकी संदर्भात जेव्हा काँग्रेस सोबत आमची आघाडी होती. त्यावेळी देखील लोकसभेचा उमेदवार निश्चित करता आला असता. अजित पवार हे शरद पवारांसोबत दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून उमेदवार जाहीर करत होते. आता आम्ही महायुतीत असून, लवकरच लोकसभा उमेदवारांची नावं जाहीर होतील आणि आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
विरोधकांचं पुतना मावशीचं प्रेम - संजू भोर पाटील : महायुती जागा वाटपात अजित पवारांना फक्त काही जागा मिळतील, शरद पवारांसोबत होते तर त्यांचा सन्मान केला जात होता अशा प्रकारचं बेगडी प्रेम महाविकास आघाडीतील नेत्यांचं फार उफाळून आलं आहे याचं कारण म्हणजे त्यांना अजित पवार तसंच महायुतीचं काही घेणं देणं नाही. फक्त आणि फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठीच महाविकास आघाडीतील नेत्यांकडून अजित पवारांबाबत अशा प्रकारची वक्तव्यं केली जात आहेत. अजित पवार स्वतः सक्षम आहेत. महायुतीतील सर्वच घटक पक्षांचा सन्मान केला जात आहे. इंडिया आणि महाविकास आघाडीत काय सुरू आहे याकडं लक्ष केंद्रित करावं महायुतीतील घटक पक्षांची काळजी करण्याची विरोधकांना गरज नसल्याचं भोर पाटील यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांच्या इमेजवर परिणाम - आनंद गायकवाड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार भाजपासोबत सत्तेत गेले. महायुतीतील घटक पक्षांमध्ये सर्वाधिक महाविकास आघाडीतील नेत्यांकडून वारंवार अजित पवार यांच्यावर टीका टिप्पणी केली जात आहे. अजित पवार महाविकास आघाडीला सोडून, गेले या धक्क्यातून महाविकास आघाडी बाहेर आली नाही. अजित पवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांची लोकांमध्ये जी क्रेझ आहे त्याला डॅमेज करण्यासाठी त्याचा फायदा महाविकास आघाडीला मिळेल अशा प्रकारची रणनीती महाविकास आघाडीकडून केली जात असावी. येत्या लोकसभा निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीकडून अजित पवारांवर टीकेची तीव्रता अधिकच वाढताना दिसेल असं राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी म्हटलं आहे.
पॉवर कोणत्या पवारांना साथ देते हे महत्वाचं : राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात. मात्र, अनेक वर्ष सत्तेत राहून विकास कामं करण्याची एक आगळीवेगळी शैली निर्माण करणाऱ्या शरद पवारांच्या तालमीत तयार झालेल्या अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून शिवसेना भाजपासोबत सत्तेत बसल्याने महाविकास आघाडी त्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष धक्क्यातून सावरायला तयार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकीत कोणती पॉवर कोणत्या पवारांना साथ देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
हेही वाचा :
3 Pravin Darekar : महायुतीत विसंवाद होईल, असं वक्तव्य करू नका...; प्रवीण दरेकरांचा बच्चू कडूंना सल्ला