नवी मुंबई Navi Mumbai MNS : नवी मुंबईच्या तुर्भे येथील 'द फर्न' हॉटेलमध्ये काम करत असलेल्या एका मराठी महिला कर्मचाऱ्याला हॉटेल मधील दोन अमराठी कर्मचारी मानसिक त्रास देत होते. याबाबत पीडित महिलेनं मनसेच्या नवी मुंबई शहर अध्यक्षांना फोन करून तक्रार केली. त्यानंतर शहराध्यक्ष गजानन काळे यांनी हॉटेलमध्ये जाऊन या कामगारांना चांगलाच चोप दिला. महिलेचा मानसिक छळ करणाऱ्या या अमराठी कर्मचाऱ्यांना एपीएमसी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या अटकेची कारवाई सुरू आहे.
हॉटेल प्रशासनाचं दुर्लक्ष : ही 30 वर्षीय महिला तुर्भे येथील द फर्न हॉटेलमधील पेस्ट्री विभागात काम करत होती. हॉटेलमधील दोन अमराठी कर्मचारी, संतोष कुमार आणि सरफराज शेख तिला मानसिक त्रास देत होते. यामुळे महिला प्रचंड तणावाखाली होती. याला कंटाळून महिलेनं हॉटेल प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र प्रशासनानं तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत उलट तिलाच माफी मागायला लावली. तसेच तिच्याकडून राजीनामाही लिहून घेतला.
अटकेची कारवाई सुरू : या घटनेमुळे हताश झालेल्या महिलेनं नवी मुंबईच्या मनसे शहराध्यक्षांशी संपर्क साधला. यानंतर ते मनसेच्या कार्यकर्त्यांसह हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यांनी हॉटेल प्रशासनाला जाब विचारला आणि त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांना हजर करण्यास सांगितलं. जर कर्मचाऱ्यांना हजर केलं नाही तर हॉटेलमध्ये तोड-फोड करू अशी तंबी त्यांनी दिली. यानंतर संबंधित पीडित महिलेची तक्रार पोलीस प्रशासनाकडे दाखल करण्यात आली. सध्या एपीएमसी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या अटकेची कारवाई सुरू आहे.
हे वाचलंत का :