मुंबई New green way : मुंबई-पुणे अंतर आणखी कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 29.15 किमी सहा पदरी हरित महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी 3 हजार 101 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. मुंबई-पुणे ही दोन महत्त्वाची औद्योगिक शहरे आहेत. मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं मिसिंग लिंक प्रकल्प राबविण्यात आला होता.
यापूर्वी मुंबई-पुणे दरम्यान हायपरलूप हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित होता. मात्र कालांतरानं हा प्रकल्प बारगळला. सध्या या नवीन हरित महामार्गाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. मुंबई-नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या शिवडी ते न्हावा-शेवा म्हणजेच अटल सागरी सेतूच्या उद्घाटनानंतर कोकण महामार्गामुळं गोवा राज्याचं अंतरही दोन तासांनी कमी होणार आहे. सध्या रस्ते विकास महामंडळानं या महामार्गाचं काम विविध टप्प्यात सुरू केलं.
नवा हरित मार्ग : प्राधिकरणानं जेएनपीएजवळील पोगोटे जंक्शन ते मुंबई-पुणे दुर्गाती महामार्ग चौक जंक्शनपर्यंत 29 किमी लांबीचा हरित महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी डी. चव्हाण यांनी दिली. या प्रकल्पासाठी सुमारे 310 कोटी 36 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सुमारे दोन वर्षात या महामार्गाचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. हा महामार्ग बांधल्यानंतर टोलच्या माध्यमातून हा खर्च वसूल करण्यात येणार आहे. या महामार्गाचा मुंबई-पुण्यात खोपोली परिसरालाही मोठा फायदा होईल, असा दावा प्राधिकरणानं केला आहे. या नव्या सहा पदरी 29 किलोमीटरच्या हरित महामार्ग प्रवाशांचा वेळ वाचणार असल्याचंही अधिकारी चव्हाण यांनी सांगितलं.
काय आहेत अन्य मार्ग ? : राज्य सरकारच्या माध्यमातून मुंबई-पुणे महामार्गासह अन्य जोड महामार्गांमधील अंतर कमी करण्यासाठी सरकारच्या वतीनं प्रयत्न सुरू आहेत. मुंबई ट्रान्सहार्बर लिंकवरील गर्दी कमी करण्यासाठी चिर्ले टोका ते गव्हाणफाटा तसंच पळसपेफाटा ते मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे असा 7.35 किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर 1 हजार 351.73 कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे. ही कामे राज्य सरकारकडून सुरू आहेत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं मुंबई-पुणे महामार्गावरील पोगोटे जंक्शन ते जेएनपीटीजवळील चौक जंक्शनपर्यंत 29 किलोमीटर लांबीचा सहा पदरी हरित महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
हे वचालंत का :