नाशिक -खासगी बँकेत ग्राहकांनी तारण ठेवलेले 222 लोकांचे 5 कोटींचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याची घटना नाशिकच्या गंगापूर रोड भागात घडली आहे. बँकेत असलेले सीसीटीव्ही बंद करून चोरट्यांनी सोन्यावर डल्ला मारला आहे. शनिवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील जुना गंगापूर नाका येथील इंदिरा हाइट्स व्यापारी संकुलात आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीची शाखा कार्यरत आहे. या शाखा कार्यालयात असलेल्या सेफ्टी लॉकरमध्ये सुमारे 222 ग्राहकांची 13,385.53 ग्रॅम इतक्या वजनाचे दागिने ठेवले होते. चार मे रोजी बँकेचे कामकाज आटपून ग्राहकांनी दिवसभर तारण ठेवलेले सोने लॉकरमध्ये ठेवण्यास गेलेल्या बँकेच्या कर्मचाऱ्यास लॉकरमध्ये यापूर्वी तारण ठेवलेले सोने आढळले नाही. त्याने तातडीने संबंधित व्यवस्थापक गुजराती यांना हा प्रकार सांगितला. गुजराती यांनी लॉकर मधील सोन्याचे विवरण तपासले असता लॉकरमधून 4 कोटी 92 लाखांचे सोन्याचे विविध दागिने चोरून नेल्याचे दिसून आलेय या घटनेची माहिती सरकारवाडा पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
कोरोना सेफ्टी सूट घालून चोरी- कोरोना काळात रुग्णालयात कर्मचाऱ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या सेफ्टी सुटचा एका चोरट्याकडून वापर करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. ओळख लपवण्यासाठी दोघांपैकी एकानं पांढऱ्या रंगाचा कोविड सूट अंगात घातला होता. चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर या सूटची टोपी असल्याचे दिसते. दुसऱ्यानं अंगात एक टी-शर्ट, जीन्स पॅन्ट, डोक्यावर पांढरी टोपी आणि चेहऱ्यावर मास्क लावला आहे.
एसीच्या खिडकीतून बँकेत प्रवेश- गंगापूर रोड येथील आयसीआयसीआय बँकेची तारण शाखा एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. या बँकेबाहेर 24 तास बँकेचा सुरक्षा रक्षक तैनात असतो. बँक बंद झाल्यावर अधिकृत व्यक्तीकडे असलेल्या चाव्यांशिवाय कोणी तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केल्यास सायरन वाजतो. तसेच सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मात्र, चोरट्यांनी दोन्ही यंत्रणा बंद करून दरोडा टाकला. बँकेचे कामकाज बंद झाल्यानंतर एसी दुरुस्तीसाठी असलेल्या खिडकीतून प्रवेश करत ही चोरी केल्याचं समोर आलं आहे.
आजी -माजी कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा संशय- "या चोरीमध्ये संबंधित कंपनीच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकासह आयुक्त कार्यलयातील गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास केला जात आहे. चोरीच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लवकरच चोरांना पकडण्यात पोलिसांना यश येईल" असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी सांगितलं.
हेही वाचा-