नाशिक : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) जोरदार रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत, तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान, असं असतानाच आता नाशिकमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ईव्हीएम हॅक करतो, असं म्हणत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार वसंत गीते यांच्याकडं तब्बल 42 लाख रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी एकाला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे.
आरोपीला अटक : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीची संधी साधून पैसे कमवण्यासाठी राजस्थानमधील अजमेर येथील भगवानसिंग चव्हाण हा तरुण थेट नाशिक मध्य मतदारसंघाचे उमेदवार वसंत गिते यांच्या प्रचार कार्यालयात आला. त्यानं ईव्हीएम मशीन हॅक करून गीतेंना जिंकून देतो असं सांगत तब्बल 42 लाख रुपयांची मागणी केली. तसंच या रक्कमेतील 5 लाख रुपये आजच द्या, अन्यथा गीतेंना पराभूत करेन, अशी धमकीही त्यानं कार्यालयातील गीते समर्थक आनंद शिरसाठ यांना दिली. त्यानंतर याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर काही तासातच गुन्हे शोध पथकानं तपास करत चव्हाण याच्या मुसक्या आवळल्या.
- मार्बलचं काम करायचा : भगवानसिंग चव्हाण हा मूळ अजमेर, राजस्थान येथील आहे. गेल्या काही महिन्यांपासून आरोपी नाशिकच्या मखमलाबाद परिसरात वास्तव्यास आहे. मार्बलचे काम करणाऱ्या चव्हाण यानं निवडणुकीची संधी साधून पैसे कमवण्यासाठी शक्कल लढवली असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.
- यापूर्वीही उघडकीस आलं होतं प्रकरण : काही दिवसांपूर्वी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार देवयानी फरांदे यांच्याकडंही तिकीट मिळवून देतो असं सांगून पैशांची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील दोन युवकांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -
- ईव्हीएमविषयी बोलणं भोवणार? राहुल गांधी, उद्धव ठाकरे, संजय राऊतांसह युट्यूबर ध्रुव राठीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल - Mumbai High Court
- इव्हीएमचे सुरक्षा रक्षक झोपले; जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करताना उघड झाला प्रकार, सहफौजदारांवर निलंबनाची कुऱ्हाड
- ईव्हीएम मशीननं उठवलं रान; 'ईव्हीएम' खरंच हॅक होतं का? जाणून घ्या... - EVM Machine Hacking