मुंबई- जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे गुरुवारी कर्करोगानं निधन झाले. त्यांचा कर्करोग हा शेवटच्या टप्प्यात पोहोचला होता. अनिता गोयल यांच्या पश्चात त्यांचे पती आणि दोन मुले, नम्रता आणि निवान गोयल असा परिवार आहे.त्यांचे पती तथा जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडं जामिन मिळण्यासाठी विनंती केली होती. त्यांना नुकतेच जामिन मिळाला आहे.
कंपनीच्या कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून अनिता गोयल या कंपनीच्या कामकाजात भाग घेत होत्या. नरेश गोयल यांना 1 सप्टेंबर 2023 रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. "पत्नीचा कर्करोग शेवटच्या टप्पात असताना तिची खूप आठवण येते. आता जगण्याची आशा सोडली आहे," असं म्हणत गोयल यांनी मुंबई उच्च न्यायालयात हात जोडले होते. त्यावर न्यायालयानं तुम्हाला निराधार सोडणार नसल्याचं सांगत जामिन दिला होता.
मुंबई उच्च न्यायालयानं काय म्हटलं होतं?- कैद्यालाही वैद्यकीय उपचाराचा अधिकार आहे, असे निरीक्षण नोंदवित मुंबई उच्च न्यायालयानं जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना वैद्यकीय कारणास्तव 7 मे रोजी दोन महिन्यांसाठी अंतरिम जामिन दिला. "गोयल यांची मुळे समाजात आहेत. त्यामुळे न्यायापासून पळ काढणे आणि पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता वाटत नाही," अशी मुंबई उच्च न्यायालयानं टिप्पणी केली होती. एक लाख रुपयांचा बाँड आणि ट्रायल कोर्टाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुंबई सोडू नये अशा अटी न्यायालयानं घालून दिल्या आहेत.
अनिता गोयल यांनाही झाली होती अटक- ईडीनं सप्टेंबर 2023 मध्ये जेट एअरवेजचे संस्थापक गोयल यांना अटक केली होती. कॅनरा बँकेने जेट एअरवेजला दिलेल्या 538.62 कोटी रुपयांचा कर्ज प्रकरणात पैशांची अफरातफर केल्याचा ईडीनं आरोप केला. नरेश यांच्या पत्नी अनिता गोयल यांना नोव्हेंबर 2023 मध्येही अटक करण्यात आली होत. मात्र, त्यांचे वय आणि वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. नरेश गोयल यांनाही कर्करोग आहे. त्यांच्या जामिनाला ईडीनं वेळोवेळी विरोध केला आहे.
हेही वाचा-