नंदुरबार : नंदुरबारमध्ये ऑक्सिजन सिलेंडरच्या गोडाऊनला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग (Nandurbar Oxygen Cylinder Godown Fire) लागल्यामुळं मोठा भडका उडाला. या आगीत सुमारे दोन ते तीन दुकानं जळाल्याची माहिती समोर झाली आहे. तर ऑक्सिजन सिलेंडरचादेखील स्फोट झाला असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय.
ऑक्सिजन गोडाऊनला भीषण आग : नंदुरबार शहरातील उड्डाणपुलाखाली असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरच्या गोडाऊनला रात्री भीषण आग लागल्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली होती. नागरिकांनी मिळेल त्या साधनांनी गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसंच गोडाऊन आणि त्याच्या नजीक असलेली दुकानं खाली करण्याचा प्रयत्न केला. मात्र, थोड्यावेळातच आगीनं रौद्र रूप धारण केलं. यावेळी गोडाऊनमध्ये असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरचादेखील स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच नंदुरबार नगरपालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले. सुमारे तीन ते चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अखेर आग विझवण्यात यश आलं. पोलीस कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी गोडाऊनमध्ये असलेले ऑक्सिजन सिलेंडर तत्काळ बाहेर काढल्यामुळं मोठा अनर्थ टळला.
गोडाऊनमध्ये 30 ते 40 सिलेंडर : मिळालेल्या माहितीनुसार, आग लागली तेव्हा गोडाऊनमध्ये 30 ते 40 ऑक्सिजन सिलेंडर होते. या आगीत गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झाले आहे. तर लगत असलेली दोन ते तीन दुकानंदेखील जळून खाक झाली आहेत. याबाबत नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात अग्नी उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाबड आणि उपनगर पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली.
हेही वाचा -