नंदुरबार Nandurbar accident : जखमींना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून सुमारे ७०० ते ८०० मीटर खोल दरीत महिंद्रा पिकअप कोसळल्यानं या अपघातात वाहनाचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मसावद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
असा घडला अपघात : धडगाव तालुक्यातील लेगापाणी येथील चौधरी कुटुंबीयांनी अक्कलकुवा येथून वाहन (क्र.एफ.एच.२० वाय ६७९७) महिंद्रा पिकअप खरेदी केल्यानंतर ते आपल्या नातेवाईकांसह घरी लेगापाणी येथे येत होते. आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गोरंबा ते लेगापाणी दरम्यान असलेल्या गोरंबा घाटातील अवघड वळणावर चालक सुनिल दारासिंग चौधरी याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप खोल दरीत कोसळली. त्यातील प्रवासी हे गाडीतून बाहेर पडल्याने त्यांच्या डोके, छातीला गंभीर मार लागल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात जखमा होऊन रक्तस्त्राव झाला. या अपघातात कांतीलाल जेठ्या वसावे (रा.वाडीबार, मोलगी, ता.अक्कलकुवा), साबलीबाई दारासिंग चौधरी, दारासिंग कुवरसिंग चौधरी, धीरसिंग पुन्या पाडवी (सर्व रा.लेगापाणी ता.धडगाव) या चौघांचा मृत्यू झाला. तर वाहनचालक सुनिल दारासिंग चौधरी, गोविंद हूपसिंग वळवी या दोघांना डोके आणि छातीला मार लागल्यानं म्हसावद ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रस्ते बांधणीत तांत्रिक चुका : सातपुडा पर्वत रांगेत गोरंबा ते लेगापाणी दरम्यान संपूर्ण घाट रस्ता आहे. घाटात उताराची, चढाची धोकादायक वळणे आहेत. हा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत गेल्या पाच वर्षांपासून निर्माणचे कार्य सुरू आहे. अतिशय धोकादायक घाटात रस्ता तयार करताना योग्य पद्धतीनं वळणावर नियमानुसार रस्त्याची निर्मिती केली गेली नसल्यानं तसेच वाहनांवर सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले कठडे व तत्सम उपायोजना ठेकेदारानं केली नाही. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे. लेगापाणीपासून काही अंतरावर एका धोकेदायक वळणावर पिकअप वाहन चढत असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. यानंतर हे वाहन मागच्या बाजूला येऊन खोल दरीत ७०० ते ८०० मीटर अंतरावर जाऊन कोसळलं.
मसावद पोलीस घटनास्थळी दाखल : अपघाताची माहिती मिळाल्यानंतर म्हसावदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे, पोलीस कर्मचारी दादाभाई साबळे, राकेश पावरा, उमेश पावरा, कलीम रावताळे, मोहन सावळे, महिला कर्मचारी वर्षा पानपाटील यांनी ग्रामस्थांनी मदत कार्यास सुरुवात केली. झोळी करून पार्थिव आणि जखमींना लेगापाणी येथे आण्यात आलं. त्यानंतर जखमींना रुग्णवाहिकेत नेऊन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. खोल दरी असल्यानं खाली दरीतून वर रस्त्यापर्यंत मृतदेह आणि जखमींना आणताना पोलीस कर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांना तासभर वेळ लागला.
हेही वाचा:
- आमदारांसह खासदाराच्या बहुमतावर पक्ष ठरवणं का आहे घातक? विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर घटनातज्ञांनी मांडलं मत
- मनोज जरांगेंची तब्येत खालावली, मराठा आरक्षणाकरिता संतप्त आंदोलकांचा धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको
- मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत राज्य सरकारला चिंता, वैद्यकीय तपासणी करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश