सातारा Nana Patole on CM Eknath Shinde : परदेशी कशाला जायचं, असं ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी प्रत्युत्तर दिलंय. "राज्यात दुष्काळ आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याकडं लक्ष द्या. पुन्हा तुम्हाला शेतीच करायची आहे," असा उपरोधिक टोला पटोलेंनी लगावलाय. ते कराडमध्ये बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसाच्या सुट्टीवर आपल्या गावी आले आहेत. शेतीची पाहणी करतानाचा व्हिडिओ ट्विट करत परदेशी कशाला जायचं, गड्या आपला गाव बरा, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. त्याच अनुषंगानं बोलताना नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला दिलाय. "एकनाथ शिंदेंना नजिकच्या काळात शेतीच करायची आहे. पण, मुख्यमंत्री असल्याचं भान ठेवून सध्या त्यांनी दुष्काळग्रस्त भागात दौरा करावा," असं त्यांनी म्हटलं आहे.
लोकांचे प्रश्न मांडले तर स्टंट : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष दिवंगत प्रतापराव भोसले यांच्या निधनानंतर कुटुंबीयांच्या भेटीसाठी ते विमानानं कराड विमानतळावर आले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, "राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. दुसरीकडं शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री सुट्टीवर आहेत. पुणे हीट अँड रन प्रकरणात दोघांचा बळी गेला आहे. परंतु, आम्ही लोकांचे प्रश्न मांडले, तरी सत्ताधाऱ्यांना तो स्टंट वाटतो," असं प्रत्युत्तर पटोल्यांनी शंभूराजे देसाईंना दिलं.
17 पैकी 16 जागा जिंकू : नाना पटोले म्हणाले की, "महाराष्ट्रात काँग्रेसनं लोकसभेच्या १७ जागा लढवल्या आहेत. त्यापैकी १६ जागा आपण जिंकू, असा अहवाल आहे. एक जागेवर अटीतटीचा सामना आहे. ती जागा निघाली तर लोकसभेच्या सर्व जागा आम्ही जिंकू," असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला. दरम्यान, "एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्री आहोत, याचं भान ठेवावं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घ्यावी. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडं लक्ष द्यावे. भविष्यात त्यांना शेतीच करायची आहे," असा टोलाही लगावला.
गरीबांना रस्त्यावर चालण्याचा अधिकार नाही : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावर बोलताना पटोले म्हणाले की, "गरिबांना रस्त्यावर चालण्याचा अधिकार राहिलेला नाही. श्रीमंत लोक, त्यांची मुलं पबमध्ये गाडीची रेस लावून गरीबांना चिरडून टाकतील. त्यावर आम्ही बोललो तर सत्तेतल्या नेत्यांना तो स्टंट वाटतो. अपघातावेळी त्या गाडीत कोण कोण होतं, हे पुढं आलं पाहिजे. पोलीस हे प्रकरण का दाबत आहेत? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. या प्रकरणात कोणाचा दबाव आहे, हे सगळं समोर आलं पाहिजे," अशी मागणी पटोलेंनी केली.
हेही वाचा