नागपूर Metro Run For Save Parrot : मकर संक्रातीचा सण संपून महिना लोटला आहे. मात्र, पतंगबाजीच्या जीवघेण्या पाऊलखुणा अजूनही कायम आहेत. किंबहुना पक्षांसाठी त्या मृत्यूचा सापळाच ठरत आहेत. नागपूर शहरातील कामठी मार्गावर असलेल्या मेट्रोच्या पुलावरील रेलिंग (सुरक्षा कठडे) मध्ये गुंडाळलेल्या मांज्यात एक पोपट अडकला होता. रेस्क्यू पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांना ही रेस्क्यू करणं अश्यक्य असताना, चक्क मांजात अडकलेल्या पोपटाचा जीव वाचवण्यासाठी मेट्रो धावली आणि त्या पोपटाचा जीव वाचवला.
पोपट मांजामध्ये अडकल्याची माहिती पक्षीप्रेमींनी आम्हाला दिली होती. त्यानंतर लगेच वरिष्ठांशी चर्चा करण्यात आली. मानवीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन लगेच एक मेट्रो ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मांज्यात अडकलेल्या पोपटाला वाचवण्याची मोहीम राबवण्यात आली. - अखिलेश हळवे,सीनियर डीजीएम, कार्पोरेट कम्युनिकेशन डिपार्टमेंट, महामेट्रो
मांज्यात अडकला पोपट : ही घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. त्याचं झालं असं की, गड्डीगोदाम भागातील मेट्रोच्या पुलावरील सुरक्षा कठड्यात गुंडाळलेल्या मांज्यात एक पोपट अडकला होता. यासंदर्भातील माहिती रेस्क्यू पथकाला समजली. तेव्हा त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून मांज्यात अडकडलेल्या पोपटाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण दुर्दैवानं तो पोपट ज्या ठिकाणी अडकलेला होता. तिथपर्यंत रेस्क्यू पथकाला पोहोचता येत नव्हतं.
पोपटापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न : रेस्क्यू पथक अपयशी ठरल्यानंतर, अग्निशमन दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, दुर्दैवानं ते सुद्धा पोपटापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यांची शिडी तिथपर्यंत जात नसल्यानं त्यांचा नाईलाज झाला होता. पोपटापर्यंत पोहोचण्याचे सगळे रस्ते बंद झाले असं वाटतं असताना, एका तरुणानं समयसूचकता दाखवत थेट मेट्रो स्टेशन गाठलं.
असा वाचला पोपटाचा जीव : हरीश किनकर यांनं जवळचं असलेलं गड्डी गोदाम मेट्रो स्टेशन गाठलं, तिथल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. स्टेशनपासून १०० मीटर मेट्रो ट्रॅकनं जायचं होतं. तेव्हा सगळ्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी सल्लामसलत करुन परवानगी दिली. त्यानंतर हरीश किनकर आणि एक मेट्रो कर्मचारी मेट्रोत बसून १०० मीटर गेल्यावर मेट्रो थांबवून ट्रॅकवर उतरुन पोपटाचा जीव वाचवला.
पोपटाचा जीव वाचवण्यासाठी धावली मेट्रो : पोपटाला वाचवण्यासाठी मेट्रो ट्रेन मधातच ट्रॅकवर थांबवण्यात आली होती. त्यासाठी मेट्रोकडून काही वेळासाठी कामठी मार्गावरील वाहतूक खंडित केली होती. पोपटाचं यशस्वी रेस्क्यू झाल्यानंतर मेट्रो ट्रेन पुन्हा धावू लागली. ही पहिली वेळ असेल की, एखाद्या पक्षाला वाचवण्यासाठी मेट्रो धावली असेल. तर अनेक तासांच्या अथक प्रयत्न आणि परिश्रमाअंती पोपटाला जीवदान मिळालं असलं, तरीही तो पोपट जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंन्टरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मानवीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन निर्णय : "पोपट मांजामध्ये अडकल्याची माहिती पक्षीप्रेमींनी आम्हाला दिली होती. त्यानंतर लगेच वरिष्ठांशी चर्चा करण्यात आली. मानवीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन लगेच एक मेट्रो ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मांज्यात अडकलेल्या पोपटाला वाचवण्याची मोहीम राबवण्यात आली," अशी माहिती महामेट्रोचे कार्पोरेट कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे सीनियर डीजीएम अखिलेश हळवे यांनी दिली आहे.
हेही वाचा -