नागपूर Nagpur Accident : गिट्टीखदान परिसरात एका महिलेनं मोबाईलवर बोलत सुसाट कार चालवताना तीन दुचाकी उडवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.25) घडली. कार वेगानं असल्यानं दुचाकीला धडक दिल्यावर ही कार समोरच्या झाडावर आदळली, त्यामुळं मोठा अनर्थ टळला. या अपघातात दोन दुचाकी चालकांसह भाजीविक्रेता गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या समोरचं हा थरारक अपघात घडला.
घटना नेमकी कशी घडली? : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या समोरच्या रस्त्यावरच भाजीबाजार भरतो. काल संध्याकाळी एमएच 31 एफयु 1821 क्रमांकाची कार तीन दुचाकींना उडवत भाजीपाला दुकानाला धडक देऊन झाडावर आदळली. कार एक महिला (महिलेचे नाव आद्यप कळू शकलेले नाही) चालवत होती. कार चालवत असताना महिलेच्या एका हातात मोबाईल होता, तर दुसऱ्या हातात कारचं स्टेअरिंग होतं. गर्दिच्या ठिकाणी महिलेनं कारचा वेग कमी करण्याऐवजी वाढवला. त्यामुळं महिलेचं कारवरील नियंत्रण सुटलं. अनियंत्रित कार सांभाळण्याच्या प्रयत्नात हा भीषण अपघात घडला.
व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल : या अपघातामध्ये एक गंभीर जखमी झाला असून 2 जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातात कारचं, दुचाकींचं नुकसान झालं असलं तरी मोठा अनर्थ टळला. घटना गिट्टीखदान पोलीस स्टेशन समोर घडल्यानं पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
हिट अँड रन घटनांमध्ये वाढ : काही महिन्यांपूर्वी नागपूर शहरातील राम झुलावर रितिका मालू नामक गर्भश्रीमंत महिलेनं दुचाकींना धडक दिल्यानं दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर नागपूर शहरात हिट अँड रनच्या अनेक घटना घडल्या असून त्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागलाय. हिट अँड रनच्या अशा घटना रोखण्यासाठी प्रशासन फारसे प्रयत्न करताना दिसत नाही.
हेही वाचा