नागपूर MVA Leaders On Maharashtra Bandh : बदलापूर येथे दोन चिमुरड्या मुलींवरील अत्याचाराविरोधात उद्या (24 ऑगस्ट) महाविकास आघाडीकडून पुकारलेला 'महाराष्ट्र बंद' बेकायदेशीर असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय. त्यामुळं हा बंद मागे घेण्यात यावा, असं आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. महाविकास आघाडीतील घटकपक्ष काय निर्णय घेतील याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.
जनतेच्या मनातील आक्रोशाला न्याय मिळावा : "आज न्यायालयानं महाराष्ट्र बंद संदर्भात दिलेल्या निर्देशाचा आम्ही सन्मान करतो. परंतु, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थाचे धिंडवडे निघाले असताना लोकांच्या मनात राग आहे. काही वेळापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीडच्या बस स्थानकावर एका मुलीवर अत्याचार झाला. जनतेच्या मनातील आक्रोशाला न्याय मिळावा म्हणून उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती," असं विजय वडेट्टीवार म्हणाले. तसंच नागपूरमधील संविधान चौक येथे उद्या तोंडाला काळी पट्टी बांधून मूक आंदोलन करण्यात येणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.
मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून बदलापूरच्या चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या विरोधात उद्या सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्ह्यात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन महिला विरोधी महायुती सरकारचा…
— Nana Patole (@NANA_PATOLE) August 23, 2024
शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील एक्सवर पोस्ट करत आपल्या पक्षाची भूमिका मांडली आहे. " न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा आम्ही सन्मानच करतो. परंतु, उद्याचा बंद महाराष्ट्रातील जनतेच्या आक्रोशाला वाट मोकळी करून देण्यासाठी आहे," असं विधानसभेतील विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते आज नागपूर विमानतळावर बोलत होते.
काय म्हणाले उद्धव ठाकरे? : आज (23 ऑगस्ट) सायंकाळी 7 वाजता शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका जाहीर केली. ते म्हणाले, "मुंबई उच्च न्यायालयानं जितका तत्परतेनं निर्णय घेतला तसा बदलापूर घटनेतील आरोपीला शिक्षा देण्यासाठीही घ्यावा. आम्ही बंद करण्याचं आवाहन केलं होतं, दगडफेक करण्याचं नाही. लोकांनी आपल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत का? उद्या 11 वाजता शिवसेना भवनाच्या चौकात बसणार आहे. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन करणार आहे", असं ठाकरेंनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले नाना पटोले? : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक्सवर पोस्ट करत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, "उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून बदलापूरच्या चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या विरोधात उद्या सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्ह्यात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधणार आहेत. हातात काळे झेंडे घेऊन महिला विरोधी महायुती सरकारचा निषेध करणार आहेत. मी स्वतः उद्या सकाळी 11 वाजता ठाणे येथे या आंदोलनात सहभागी होणार आहे."
हेही वाचा -
- महाराष्ट्र बंद बेकायदा असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल, बंद मागे घेण्याचं शरद पवारांचं आवाहन - Bombay high court News
- उद्याचा बंद विकृती विरुद्ध संस्कृती, बंदमध्ये पोलिसांनी आडकाठी आणू नये - उद्धव ठाकरे - Maharashtra Band
- तर जनतेचा उद्रेक होणारच, महाराष्ट्र बंद राजकीय नाही : उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, महाराष्ट्र बंदची हाक - Uddhav Thackeray On Badlapur Case