कोल्हापूर Kolhapur Ganpati Visarjan 2024 : राज्यासह देशाला पुरोगामी विचार देणाऱ्या कोल्हापुरात सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण असते. यंदाच्या मिरवणुकीत महापालिकेच्या वैद्यकीय पथकातील 'ताराराणीं'नी (Muslim Womens Health Team) वैद्यकीय सेवा बजावून आरोग्याला आधार आहे. शिवाय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घालून दिलेल्या सर्वधर्मसमभावाचा संदेशही आपल्या कार्यातून दिला आहे. या चौघी मुस्लिम वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं शाहूनगरी कोल्हापुरात कौतुक होत आहे.
जागेवरच दिल्या आरोग्य सुविधा : लाडक्या गणरायाला निरोप देणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते आणि पोलिसांना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पथकाकडून देण्यात आल्या. मिरवणुकीचा मुख्य मार्ग असलेल्या मिरजकर तिकटी-पापाची तिकटी- गंगावेश या मार्गावर येणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना आणि अत्यावश्यक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना या पथकाने प्राथमिक आरोग्य सुविधा जागेवरच पोहोचवल्या.
शाळा महाविद्यालयात शिकताना 'विविधतेत एकता' ही संकल्पना आम्ही शिक्षकांकडून ऐकत होतो. मात्र, आता मोठ्या उत्सव काळात सामाजिक सलोखा आणि विविधतेत एकता या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्या. मंडळाच्या छताखाली चार घरातील चार लोक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात, गणेशोत्सवानिमित्ताने आपापसातील वैर, जातीभेद हे सर्व विसरून सर्वजण गुण्या गोविंदाने नांदावेत हीच बाप्पा चरणी प्रार्थना करते. - डॉ. महेक बारगीर, युवा वैद्यकीय अधिकारी
सामाजिक सलोखा जपण्यासाठी कोल्हापूरकर पुढे : पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. महेक बारगीर, डॉ. आर्शिया पठाण, डॉ. सोमय्या नदाफ, शफीक मुजावर यांच्यासह अभिषेक कांबळे यांनी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत केलेली वैद्यकीय सेवा वाखाणण्याजोगी आहे. जातीपातीच्या भिंती काढून सामाजिक सलोखा जपण्यासाठी कोल्हापूरकर नेहमीच पुढे असल्याचं हे उत्तम उदाहरण असल्याच्या प्रतिक्रिया, कोल्हापूरकरांनी दिली आहे. तर बाप्पा चरणी अर्पण केलेली सेवा समाधान देत असल्याची प्रतिक्रिया डॉ. महेक बारगीर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केली.
हेही वाचा -
- 'मुंबईचा राजा' गणपती बाप्पाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन; आतापर्यंत 19,996 गणपती बाप्पाला भाविकांचा निरोप - Ganesh Visarjan 2024
- पुण्यात दुसऱ्या दिवशीही विसर्जन मिरवणूक सुरू, पहा ड्रोन व्हिडिओ - pune ganesh visarjan 2024
- हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; बॅरिकेड तोडून 'पंचगंगा घाट' गणपती मूर्ती विसर्जनासाठी केला खुला - Ganeshotsav 2024