मुंबई Santosh Shelar In Judicial Custody : पुण्यातून बेपत्ता झाल्यानंतर प्रतिबंधित माओवादी पक्षात संतोष वसंत शेलार उर्फ पेंटर हा सामील झाल्याचा सुरक्षा दलांचा आरोप होता. संतोष शेलार हा आजारामुळं पुण्यात आला असता, पोलिसांनी त्याला पकडून न्यायालयासमोर हजर केलं. यावेळी राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राजेश कटारिया यांनी त्याला 17 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.
संतोष शेलार पुण्यातून बेपत्ता : संतोष वसंत शेलार उर्फ पेंटर हा 2010 पासून पुण्यामधून बेपत्ता झाला होता. त्याचा कोणताही ठाव ठिकाण पोलिसांना लागत नव्हता. त्याच्या कुटुंबीयांकडून पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. परंतु पेंटर हा प्रतिबंधित नक्षलवादी गटात सामील झाल्याचं महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचं म्हणणं होतं. त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. तो आजारी असल्यामुळं उपचार घेण्यासाठी पुण्यात आला असता, त्याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयासमोर हजर केलं.
संतोष शेलारला न्यायालयीन कोठडी : राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राजेश कटारिया यांच्यासमोर दहशतवाद विरोधी पथकानं त्याला हजर केलं. यावेळी दहशतवाद विरोधी पथकाच्या वकिलांनी त्याची पोलीस कोठडी मिळण्यासाठीचा जोरदार युक्तिवाद केला. परंतु संतोष उर्फ पेंटर याच्या बाजुनं वकिलांनी आपली बाजू लाऊन धरली. त्याला पोलीस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी मिळावी, असा बचाव त्यांनी केला. याआधी 29 जानेवारी 2024 पर्यंत संतोष शेलारला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. परंतु पोलीस बंदोबस्त उपलब्ध नसल्यामुळं त्यास त्यावेळेला न्यायालयात हजर करता आलं नव्हतं. त्यामुळं 9 फेब्रुवारी रोजी त्यास न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं 17 फेब्रुवारीपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मिलिंद तेलतुंबडेचा अंगरक्षक असल्याचा दावा : प्रतिबंधित नक्षलवादी गटात संतोष शेलार उर्फ पेंटर हा अनुभवी सदस्य असल्याचा दावा दहशतवाद विरोधी पथकानं केला आहे. त्यानं प्रतिबंधित गटासाठी अनेक मोठी कामगिरी केल्याचं महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचा दावा आहे. चकमकीत मारला गेलेला नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याचा काही काळ अंगरक्षक म्हणून संतोष शेलार उर्फ पेंटरनं काम केल्याचं दहशतवाद विरोधी पथकानं म्हटलं आहे.
हेही वाचा :