मुंबई Mumbai Serial Blasts : कुख्यात गॅंगस्टर अबू सालेमचे पुढील निर्देशांपर्यंत तळोजा कारागृहातून स्थलांतर करु नये, असे निर्देश विशेष न्यायालयानं तळोजा कारागृह प्रशासनाला दिले आहेत. सालेमला तळोजा जेलमधून दुसऱ्या कारागृहात नेताना प्राणघातक हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळे तळोजा कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हलवू नये, अशी मागणी करणारी याचिका त्यानं विशेष न्यायालयात दाखल केली. त्यावर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.
पुढील सुनावणी 28 मे रोजी : न्यायालयानं सालेम यांच्या याचिकेवर तळोजा कारागृहाचे अधीक्षक यांच्याकडं उत्तर मागितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 मे रोजी होणार आहे. पुढील आदेश देईपर्यंत तळोजा कारागृह प्रशासनानं अबू सालेमला दुसऱ्या कारागृहात स्थलांतरित करू नये, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी असलेल्या अबू सालेमचं पोर्तुगाल येथून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं होतं. 19 वर्षांपूर्वी भारतात प्रत्यार्पित केल्यानंतर अबू सालेम तुरुंगातच आहे.
अबू सालेमला ऑर्थररोड कारागृहात : पोर्तुगाल इथून प्रत्यार्पण झाल्यानंतर अबू सालेमला ऑर्थररोड कारागृहात ठेवण्यात आलं. तिथ मुस्तफा डोसाकडून हल्ला झाल्यावर त्याला तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं. तिथं डोसाच्या सहकाऱ्यानं हल्ला केल्यावर त्याला ठाणे कारागृहात ठेवण्यात आलं. मात्र नंतर पुन्हा तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं. सध्या तो तळोजा कारागृहातील अंडा सेलमध्ये आहे. मात्र आता तळोजा कारागृह प्रशासनानं अंडा सेलच्या दुरुस्तीच्या कारणासाठी अबू सालेमला दुसऱ्या कारागृहात नेण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता : तळोजा कारागृह प्रशासनाच्या निर्णयामुळं अबू सालेम धास्तावला आहे. त्याला जीवाची भीती वाटत आहे. दुसऱ्या कुठल्याही मध्यवर्ती कारागृहात आपल्यावर प्राणघातक हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली. तळोजा कारागृह येथून दुसऱ्या कारागृहात स्थलांतरित करु नये, अशी याचिका त्यानं न्यायालयात दाखल केली. आता त्याची शिक्षा संपण्याची वेळ जवळ आली असताना एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात नेताना आपल्यावर प्राण घातक हल्ला होऊ शकतो, अशी भीती त्यानं याचिकेत व्यक्त केली. छोटा राजनचे साथीदार आणि इतर गुंड आपल्यावर हल्ला करु शकतात. मुंबई, अमरावती, कोल्हापूर, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह अशा विविध ठिकाणी आपले वैरी शिक्षा भोगत आहेत. त्यामुळं आपल्या जीवे मारू शकतात, अशी भीती सालेमनं व्यक्त केली. अबू सालेम हा तळोजा कारागृहात गेल्या पंधरा वर्षांपासून बंद आहे.
हेही वाचा
Gagster Ganesh Shinde : गॅगस्टर गणेश शिंदेची न्यायालयीन कोठडीत रवानगी