मुंबई Disha Salian Death Case : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात राणे कुटुंबीयांकडून वारंवार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. ही आत्महत्या नसून, हा मृत्यू असल्याचा दावा नारायण राणे तसंच त्यांचे पुत्र नितेश राणे करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांकडून आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे.
मविआ सरकारनं पुरावे लपवले : दिशा सालियानच्या मृत्यूवेळी मुंबई पोलीस आयुक्तांवर दबाव होता. या प्रकणाचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आले. आठ जूनच्या मस्टरमधील व्हिजिटर बुकची दोन्ही पानं फाडण्यात आली आहेत. आठ जून तसंच 13 जूनच्या दिवशी आदित्य ठाकरेचं मोबाईल लोकेशन काय होतं, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. आठ जून तसंच 13 जूनच्या दोन्ही पार्ट्यांमध्ये आदित्य ठाकरेंचा हस्तक्षेप आहे. ते तिथं उपस्थित होते. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं. वडील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा सगळ्या गोष्टी लपवण्यात आल्या. पण आता मुंबई पोलिसांना माहिती हवी आहे, ती माहिती मी मुंबई पोलिसांना देणार, असं नितेश राणे म्हणाले.
बऱ्यापैकी पुरावे सापडलेत : पुढं बोलताना राणे म्हणाले, या अगोदर महाविकास आघाडीच्या काळात माझ्यासह माझे वडील खासदार नारायण राणे यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. दिशा तसंच सुशांतसिंग राजपूत यांचा मृत्यू कसा झाला, तुमच्याकडे काय पुरावे आहेत, ते पुरावे आम्हाला द्या, असं आम्हाला सांगण्यात आलं. तेव्हा सातत्यानं मातोश्रीवरून पोलिसांना कॉल येत होते. ते आम्हाला जाणवत होतं. मी स्वतः काही गोष्टी तेव्हा बघितल्या होत्या. त्यावेळी सगळ्यांची लपवाछपवी केली जात होती. आदित्य ठाकरे यांना वाचवण्याचा प्रकार सुरू होता. पण आता माझ्याकडं माहिती आहे. ती सगळी सत्य माहिती मी मुंबई पोलिसांना, एसआयटीला देणार आहे. एसआयटीला बऱ्यापैकी पुरावे सापडलेले आहेत, असं नितेश राणे म्हणाले.