मुंबई Abhishek Ghosalkar : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बोरिवलीच्या आयसी कॉलनीतील मॉरिस नोरोन्हानं त्यांच्या कार्यालयात घोसाळकरांवर पाच गोळ्या झाडल्या होत्या. तसंच त्यानं नंतर स्वत: आत्महत्या केल्याचा संशय आहे. मॉरिस नोरोन्हानं गोळीबारात वापरलेलं विदेशी बनावटीचं पिस्तूल त्याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याच्या नावावर असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.
मॉरिसवर तीन गुन्हे दाखल : या आधी मॉरिसवर तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मॉरिसवर चोरी, विनयभंग, बलात्कार, असे एकून तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मॉरिस बलात्काराच्या आरोपाखाली पाच महिने अटकेत होता. त्यानंतर 'तो' जामिनावर बाहेर आल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
बंदूक अंगरक्षकाच्या नावावर : मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा हा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी असून मिश्रानं फुलपूर जिल्हा पोलिसांकडून 2003 मध्ये शस्त्र परवाना घेतला होता. हा शस्त्र परवाना 2026 पर्यंत वैध असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. गेल्या दोन तीन महिन्यापासून अमरेंद्र मिश्रा मॉरिसचा अंगरक्षक म्हणून काम करत होता. मॉरिस बोरिवलीत त्यांच्या काकांकडं राहात होता. अमरेंद्र मिश्रानं मुंबईत आल्यानंतर आपल्याजवळ असलेल्या शस्त्राची माहिती मुंबई पोलिसांना दिली नव्हती. त्यामुळं अमरेंद्र मिश्रा याच्यावर शस्त्र परवाना कायद्याच्या कलम 29 ब, 30 नुसार शस्त्र कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी दिली.
घोसाळकरांच्या शरीरात गोळ्या घुसल्या : या प्रकरणी कलम 302 अन्वये खुनाच्या गुन्ह्यात शस्त्र परवाना कायद्यातील विविध कलमांची वाढ करण्यात आल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेनं दिली आहे. मात्र, स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलेल्या मॉरिसच्या मृत्यूची नोंद चुकीच्या पद्धतीनं करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉरिसचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा त्याची बंदुक गोळीबार झालेल्या ठिकाणी लॉकरमध्ये ठेवत असे. मॉरिसला याची माहिती होती. मॉरिसनं फेसबुक लाइव्ह दरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्यावर पहिली गोळी झाडली होती. मात्र, ती त्यांना लागली नव्हती. नंतर मॉरिसनं त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या अभिषेक घोसाळकरांच्या शरीरात घुसल्या तर, एक गोळी घोसाळकरांच्या पोटात घुसली. त्यामुळं घोसाळकरांच्या पोटासह डाव्या खांद्याला जबर दुखापत झाली होती, असं जे.जे. रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे.
बंदुकीसह गोळ्या जप्त : घोसाळकरांवर पाच गोळ्या झाडल्यानंतर घोसाळकर काचेच्या दरवाजावर पडले. त्यानंतर दरवाजात उभा असलेल्या मॉरिसनं स्वत:च्या डोक्यात गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदुकीत गोळी नसल्यानं तो बंदुकीत गोळ्या भरण्यासाठी पोटमाळ्यावर गेला. त्यानंतर त्यानं स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. या प्रकरणी पोलिसांनी बंदुकीसह गोळ्या जप्त केल्या आहेत. गोळीबाराची घटना घडली तेव्हा, कार्यालयाबाहेर सात ते आठ लोक उपस्थित होते. त्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. मॉरिसच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर केवळ मॉरिसह घोसाळकर कार्यालयात उपस्थित असल्याचं आढळून आलं.
हे वाचलंत का :