मुंबई Salman Khan Firing Case : अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील गॅलक्सी अपार्टमेट या घरावर 14 एप्रिलला गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात कारागृहात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भाऊ अनमोल बिश्नोई याचं नाव पुढं आल्यानं मोठी खळबळ उडाली होती. अनमोल बिश्नोई यानं गोळीबारानंतर सोशल माध्यमात पोस्ट शेअर करुन इशारा दिला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अनमोल बिश्नोई याच्याविरोधात लूक ऑऊट नोटीस जारी केली आहे.
अनमोल बिश्नोईविरोधात लूक आऊट नोटीस : अभिनेता सलमान खान याच्या वांद्य्रातील गॅलक्सी अपार्टमेंट या घरावर 14 एप्रिलच्या रात्री गोळीबार केल्यानं देशभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुजरातमधील भूज इथून सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी पनवेलमध्ये एक महिनाभर राहून रेकी केली होती. त्यानंतर आरोपींनी 14 एप्रिलच्या रात्री गोळीबार करुन दुचाकीवरुन पलायन केलं होतं. आरोपींनी पलायन केल्यानंतर गुजरातमध्ये धूम ठोकली होती.
आरोपींनी तापी नदीत फेकली पिस्तूलं : सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन आरोपींनी गोळीबार केल्यानंतर गुजरातमधील भूज इथं मुक्काम ठोकला होता. मात्र मुंबई पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून त्यांना 48 तासाच्या आत जेरबंद केलं. या आरोपींनी गोळीबार केलेली पिस्तूल गुजरातला पळून जाताना तापी नदीत फेकून दिली होती. मुंबई पोलिसांनी तापी नदीत शोधमोहीम राबवून ती पिस्तूलं शोधून काढत जप्त केली.
अनमोल बिश्नोईची सोशल माध्यमांवर पोस्ट : कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई यानं या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली. अनमोल बिश्नोई यानं सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. यावेळी अनमोल बिश्नोई यानं सलमान खान याला इशारा दिला होता. आम्हाला शांतता हवी आहे. मात्र तुला सांगूनही तू कुख्यात गुंडांना आपलं दैवत मानलं. यावेळी फक्त तुला इशारा दिला आहे. पुढच्या वेळी गोळ्या फक्त घरावर चालणार नाहीत. आम्हाला जास्त बोलण्याची सवय नाही, तुला माहिती आहे, असा इशारा अनमोल बिश्नोई यांनी यावेळी दिला.
हेही वाचा :
- सलमान खान गोळीबार प्रकरण; 1 महिन्यापासून पनवेलमध्ये राहत होते आरोपी; गुजरातमधून हलली गोळीबाराची सूत्रे - Salman Khan Firing Incident
- सलमान खान गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठं यश; तापी नदीत फेकून दिलेली दोन्ही पिस्तूल सापडली - Salman Khan House Firing
- सलमान खान गोळीबार प्रकरणाची अनमोल बिश्नोईनं स्विकारली जबाबदारी; गोळीबार करतानाचं सीसीटीव्ही आलं समोर - Salman Khan Firing Incident