मुंबई Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलनासाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मुंबईतील जनजीवन विस्कळीत होऊ नये, म्हणून त्यांनी खारघर येथील मैदानावर आंदोलन करावं, अशी विनंती पोलिसांनी मनोज जरांगे यांना केली आहे. आता मराठा समाजाचं आंदोलन खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर होणार की मुंबईच्या आझाद मैदानावर होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनोज जरांगेंना पोलिसांची नोटीस : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं राज्य सरकारचं धाबं दणाणलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ झाला असून, लाखो समर्थक आता लोणावळ्यात पोहचले आहेत. मुंबईच्या दिशेनं भगवं वादळ कूच करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांची मनधरणी करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच मनोज जरांगे यांना आझाद मैदान पोलिसांनी नोटीस बजावली आहे. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांना मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्याची सूचना केली होती. त्यानुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे.
मुंबईमध्ये जमाबंदीचे आदेश : सांताक्रूज पूर्व येथील मराठा कॉलनीत राहणाऱ्या प्रकाश नाईक यांना निर्मल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांनी नोटीस दिली आहे. या नोटीसीमध्ये आझाद मैदान येथे आंदोलनाकरता राखीव असलेल्या मैदानाची क्षमता ही 5 हजार ते 7 हजार आंदोलकांना सामावून घेण्याची आहे. त्यापेक्षा अधिक आंदोलक मुंबईत आल्यास परिसरातील वाहतूक, दैनंदिन जीवन, व्यवहार, व्यापार बाधित होऊ शकतात. तसंच मुंबई पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र अधिनियम 1991 च्या कलम 10(2) सह 37(3) मधील अधिकारांचा वापर करून 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत मुंबईमध्ये जमाबंदीचे आदेश जारी केले आहेत. तसंच, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991 च्या कलम 37(1) (2), 2(6), 10(2) द्वारे 11 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत प्रतिबंधात्मक हत्यार बंदीचा आदेश जारी करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई : त्याचप्रमाणं दादरमधील शिवाजी पार्कवर आंदोलन करण्यास मनाई करण्यात आल्याचं देखील नोटीसीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र, शिवाजी पार्क येथे आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसंच मोठ्या संख्येनं आंदोलक मुंबईमध्ये आल्यास जातीय, धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दूध, भाजीपाला, अग्निशमन दल, गॅस सिलेंडर यासारख्या सेवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणं आझाद मैदानाजवळ सेंट जॉर्ज रुग्णालय, कामा रुग्णालय, जीटी रुग्णालय, बॉम्बे रुग्णालय असून तेथील रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे, असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
आंदोलनामुळं दैनंदिन वाहतूक विस्कळीत : मुंबई शहर कायमच दहशतवाद्यांच्या निशाणावर आहे. या आंदोलनामुळं होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा दहशतवादी कृत्यासाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून येथे विविध वित्तीय संस्था आंतरराष्ट्रीय वकालती कार्यरत आहेत. मुंबईमध्ये दररोज 60 ते 65 लाख नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्तानं ट्रेनसह इतर साधनांनी प्रवास करतात. सकल मराठा समाजाचे समर्थक मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये आल्यास त्यामुळं मुंबईची दैनंदिन वाहतूक विस्कळीत होईल. त्यामुळं आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
हे वाचलंत का :