मुंबई Mumbai Metro Election Offer : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पाचवा टप्प्यात मतदान होणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून शासकीय, निमशासकीय कार्यालयामधून सातत्यानं मतदान जागृती मोहिम राबवल्या जात आहेत. त्यासोबतच लोकांनी अधिक अधिक मतदान करावे, यासाठी छोटे मोठे व्यावसायिक वेगवेगळ्या ऑफर ग्राहकांना देत आहेत.
मतदान टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न : महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले आहे. राज्यातील दोन टप्प्यात झालेल्या निवडणुक टक्केवारीत घट झाल्याचे समोर येतं आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या शकल लढवल्या जातात. काही हॉटेल, पब, टॅक्सी, रिक्षा आणि शीत पेय असलेल्या दुकानांमध्ये ठिकाणी मोफत सुविधा दिल्या जातात. गेल्या काही निवडणुकीत काही ठिकाणी दहा टक्क्यांपासून ते 90 टक्क्यापर्यंत डिस्काउंट कुपन देण्यात आले होते.
अशी मिळणार सवलत : मुंबई शहर आणि उपनगरामध्ये 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबईमधील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महामुंबई मेट्रो महामंडळाकडून प्रवाशांना विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 च्या सर्व प्रवाशांना 20 मे 2024 रोजी प्रवासी तिकिटावर म्हणजेच मूळ तिकिटदरावर 10 टक्के सवलत देणार असल्याचं निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांना मुंबई मेट्रो 1 कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व प्रकारच्या माध्यमातून ही सवलत दिली जाणार आहे. आतापर्यंत 90 कोटी प्रवाशांनी मुंबई मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 वरून प्रवास केला आहे. नागरिकांनी आरामदायी सुखकर प्रवास करून आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
सर्वच स्तरातून जनजागृती : निवडणूक आयोगाकडून मतदारांना मतदान करण्यास प्रेरित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदान केंद्रावर मतदारांसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा पुरविल्या जात आहे. मतदानाचा टक्का वाढवा म्हणून राजकीय पक्ष, विविध संघटना सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांकडूनदेखील जनजागृती केली जात आहे. समाज माध्यमांतून वेगवेगळ्या पोस्ट माध्यमातूनदेखील जनजागृती केली जात आहे.
हेही वाचा-