मुंबई Mumbai Local Train Update : पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकाजवळ सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी जंबो ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं पश्चिम रेल्वेने जाहीर केलंय. गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान सहाव्या मार्गिकेच्या विस्तारासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आजपासून (30 सप्टेंबर) या ब्लॉगला सुरुवात होणार आहे. हा ब्लॉक 4 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या ब्लॉकमुळं राम मंदिर ते मालाड या स्थानकादरम्यान गाड्या 30 किलोमीटर प्रतितास वेगानं धावणार आहेत. वेगमर्यादा कमी केल्यामुळं गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. दररोज सुमारे 175 लोकल सेवा रद्द होणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार, 4 ऑक्टोबरपर्यंत काम जसजसं पुढं जाईल तसतसं वेगावरील निर्बंध हटवले जातील आणि रद्द होणाऱ्या गाड्यांची संख्याही कमी होईल.
पश्चिम रेल्वेवर सकाळच्या गर्दीच्या वेळी गोरेगाव येथून चार जलद लोकल चालवल्या जातात. मात्र, जंबो ब्लॉक दरम्यान गोरेगाव येथे लूप लाइन उपलब्ध झाली नाही. त्यामुळे सकाळच्या वेळेत चालणाऱ्या चार लोकल सेवा रद्द करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतलाय. पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ब्लॉक दरम्यान मालाड स्थानकावर कट आणि कनेक्शनचं काम करण्यात आलं. या कामानंतर मालाड स्थानकाचा सध्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक 3 बदलून प्लॅटफॉर्म क्रमांक 4 करण्यात येणार आहे. तर पाचव्या मार्गावरील पॉइंट क्रमांक 105 आणि पॉइंट 109 चं काम रेल्वेकडून पूर्ण झालं असल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिलीय.
A speed restriction of 30 km/h is being imposed on all four lines (Up and Down Local, Up and Down Through) between Ram Mandir - Goregaon - - Malad section in connection with the construction of the 5th and 6th lines.
— Western Railway (@WesternRly) September 30, 2024
This restriction is being effective from 30th September 2024.…
सहाव्या मार्गाचा विस्तार : पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गीकेच्या विस्तारामुळं मेल एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार आहे. लोकल गाड्यांची सेवा वाढवण्याचा मार्गही खुला होणार आहे. डिसेंबर 2024 पर्यंत बोरिवलीपर्यंत सहाव्या मार्गाचा विस्तार करण्याची पश्चिम रेल्वेची योजना आहे. या विस्तारामुळं चर्चगेट ते बोरिवली दरम्यानच्या लोकल फेऱ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल असं पश्चिम रेल्वेनं म्हटलंय.
रेल्वेचं वेळापत्रक पाहा- पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाचं काम सुरू करण्यासाठी पुढचे काही दिवस रात्र काळात ब्लॉक घेण्यात येणार आहे. गोरेगाव येथे अप आणि डाऊन जलद मार्गावर आणि मालाड येथे अप आणि डाऊन जलद मार्गावर आणि धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येईल. हा ब्लॉक आज मध्य रात्री 12.30 ते मंगळवारी पहाटे 4.30 वाजेपर्यंत म्हणजेच 5 तासांचा ब्लॉक असेल. त्यामुळं प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं, असं आवाहन पश्चिम रेल्वेनं केलंय.
हेही वाचा -
- प्रवाशांचे होणार हाल! मुंबईत उद्या तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक, असं असेल लोकलचं वेळापत्रक - Mumbai Railway Mega Block
- रविवारी मध्य रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक; मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी एकदा वाचाच - Central Railway Special Megablock
- प्रवाशांनो लक्ष द्या...; रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगा ब्लॉक, पाहा वेळापत्रक - Mumbai Railway Mega Block