मुंबई Mumbai Heavy Rain : राज्यासह मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली असून यामुळं दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईची तुंबई झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळं मुंबईकरांचे हाल झाले. रेल्वे, रस्ते वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला असून अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. मुंबईकरांची दयनीय अवस्था झाली, यावरुन मात्र सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं सुरू केलं आहे.
नालेसफाईची श्वेतपत्रिका काढा : विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार आशिष शेलार म्हणाले, "आजच्या परिस्थितीसाठी कंत्राटदारांना जबाबदार ठरवलं पाहिजे. लोकसभा निवडणूक संपल्याच्या दुसऱ्या दिवशी मी मतदार संघातील सर्व नालेसफाईच्या कामाची पाहणी करायला जागेवर पोहोचलो होतो. तेव्हाच मी सांगितलं होतं, पालिका प्रशासन नालेसफाईचे जे आकडे देत आहे ते फसवे आणि फुगवून सांगितले जात आहेत. त्या आकड्यांमध्ये काही सत्य नाही. छोटे नाले, मोठे नाले, सौम्य वॉटर ड्रेन यातून काढलेला गाळ ज्या भूमीवर टाकला जातो ती खासगी क्षेपणभूमी आहे. त्याचा हिशेब नाही त्याचा व्हिडिओ नाही. त्याची पडताळणी नाही, म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हलगर्जी केली आहे." याचबरोबर, कंत्राटदारानं चोरी केली आहे. गेल्या 25 वर्षात ठाकरे सेनेनं मुंबई महानगरपालिकेत पावसात मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून ज्या गोष्टी करणे आवश्यक होत्या त्या गोष्टीवर पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. त्याचे हे परिणाम आहेत की आज मुंबईतल्या 27 आउटफॉलपैकी जवळजवळ 19 आउट फॉल समुद्र पातळीच्या खाली आहेत, असं म्हणत त्यांनी ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.
हेही वाचा :