मुंबई Mumbai Fraud News : उत्तराखंड राज्यातील देहराडून येथे जमीन खरेदी करुन देतो असं सांगून, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल बांधल्यास भविष्यात आर्थिक फायदा होईल, असं आमिष दाखवून 9 कोटी 44 लाख 88 हजार 663 रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान 34, 406, 409, 419 आणि 420 अन्वये आरोपी शोभेत मलेटा, रमेश मुलाशी आणि नवल पंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलं नसून तपास सुरू असल्याची माहिती, वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांनी दिली आहे.
गुंतवणुकीची केली विनंती : जुहू परिसरात राहात असलेल्या 54 वर्षीय तक्रारदार यांचा कंन्सलंटींग आणि इंन्वेस्टमेंट बँकरचा व्यवसाय आहे. त्यांचे कार्यालय वांद्रे येथे आहे. 2010 मध्ये बँकेत कामकाज बघत असताना त्यांची ओळख तेथे शाखा व्यवस्थापक असलेल्या शोभीत मलेटा याच्याशी झाली. शोभीतने तो देहराडून, उत्तराखंडचा रहिवाशी असल्याचं सांगितलं. तसेच तेथे शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांना वसतिगृह कमी पडतात. उत्तराखंडमध्ये जागा खरेदी करुन वसतिगृह बांधल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होईल, अशी माहिती सांगून तक्रारदारकडे गुंतवणुकीची विनंती केली. 2015 मध्ये त्याने कायमस्वरुपी गावी जात असल्याचं सांगत पुन्हा जागा खरेदीचा प्रस्ताव तक्रारदार यांच्यासमोर ठेवला. काही दिवसांनी तक्रारदार यांनी त्याला जागेबाबत विचारणा केली. शोभीतने त्यांना एक जागा सूचवत प्रभादेवी येथील कंपनीला जागा तपासणीचं काम दिलं.
जून 2016 कंपनी केली सुरू : कंपनीने जागा विवादीत नसल्याचं आणि त्या जागेचं निरीक्षण केल्याचं प्रमाणपत्र दिलं. त्यानंतर तक्रारदार यांनी जागा खरेदीला होकार दिला. जून 2016 मध्ये इंडी कॅम्पस स्टुडंट अकोमोडेशन डीडी-१ प्रा.लि. नावाची कंपनी सुरु करुन शोभेत मलेटा आणि रमेश मुलाशी हे संचालक बनले. याच कंपनीमार्फत देहराडून इथं विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बनवण्याकरीता जागा खरेदी आणि वसतिगृह बांधण्यासाठी एकूण आठ कोटी 29 लाख 89 हजार 884 रुपये कर्ज फायनान्स कंपनीकडून मंजूर करुन कंपनीला दिले.
अशी रक्कम केली वसूल : कर्जाचा मासिक हफ्ता 12 लाख 61 हजार 298 रुपये तक्रारदार भरू लागले. वसतिगृह बांधून झाल्यानंतर विद्यार्थी तेथे राहायला येऊ लागले. कोरोना महामारीमुळं बंद झालेले वसतिगृह जुलै 2021 मध्ये पुन्हा सुरु करण्यात आले. त्यानंतर, तक्रारदार यांनी शोभेत मलेटा याला कंपनीच्या व्यवहाराबाबत विचारणा केली. तो माहिती देण्यास टाळाटाळ करू लागला. संशय आल्यानं तक्रारदार यांनी सनदी लेखापाल पाठवून अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. शोभेत मलेटा याने अर्धवट आणि खोटी कागदपत्रे सादर केली. अधिक तपासणीमध्ये वसतिगृहात येणाऱ्या विद्यार्थ्यांची फी नवल पंत नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर जमा करून घेत शोभेत मलेटा ती रक्कम काढून घेत असल्याचं उघड झालं. पंत याच्या खात्यात 12 लाख 60 हजार रुपये जमा करुन काढण्यात आले.
विद्यार्थ्यांकडून घेतली फी : शोभेत मलेटा याने कंपनीच्या नावाशी मिळत्या जुळत्या नावाने आणखी एक खातं उघडून त्यावर विद्यार्थ्यांकडून फी घेतली. तसेच, काही विद्यार्थ्यांकडून रोखीने आणि गुगल पे वरून रक्कम घेतल्याचं समोर आलं. शोभेत मलेटा हा आपली फसवणूक करत असल्याची खात्री पटली. तक्रारदार यांनी एका मित्राकडून 75 लाख रुपये उधार घेऊन एकूण नऊ कोटी 44 लाख 88 हजार 663 रुपये गुंतवणूक केली. अखेर, त्यांनी वांद्रे पोलीस ठाणे गाठून इंडी कॅम्पस स्टुडंट अकोमोडेशन डीडी-१ प्रा.लि. कंपनी आणि कंपनीचे संचालक शोभेत मलेटा, रमेश मुलाशी तसेच नवल पंत यांच्याविरुध्द नऊ कोटी 44 लाख 88 हजार 663 रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दिली. त्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -
महाराष्ट्र सायबर सेलचं यश, गेल्या चार वर्षांत गोठविले 222. 99 कोटी रुपये - Maharashtra Cyber Cell