मुंबई- मुंबईत धुलीवंदन साजरा करताना अनेकांचा उत्साह दिसून आला. पण, अतिउत्साह हा अल्पवयीन मुलांच्या अंगलट आला. धुलीवंदन साजरा करणारे पाच अल्पवयीन मुले सोमवारी सायंकाळी माहिमजवळील समुद्रात बुडाले. हर्ष किंजले असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. यश कागडा असे बेपत्ता असलेल्या मुलाचं नाव आहे.
धुलीवंदनाच्या निमित्तानं सोमवारी सर्वत्र विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर अनेक ठिकाणी तरुण मुलं-मुली ग्रुपनं एकत्र येत रंगपंचमी साजरी करताना दिसून आले. या मुलांनी मुंबईतील अनेक चौपाट्यावर रंगपंचमीच्या निमित्तानं गर्दी केली होती. अशीच कॉलेजमध्ये शिकणारी काही मुलं माहीम समुद्रकिनारी फिरायला गेली होती. माहीम समुद्रकिनाऱ्यावर काही मुलं फिरण्यासाठी गेली असताना त्यातील पाच जण पाण्यात बुडाले. मुलं बुडाल्याची माहिती मिळताच अग्निशमन व जीवन रक्षकांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. पाण्यात बुडाल्यापैकी चार जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी समद्रातून बाहेर काढले. हर्ष किंजले या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर यश कागडा या मुलाचा अग्निशमन विभागाकडून शोध सुरू आहे. दोन मुलांवर हिंदुजा रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
सुरक्षा मनोरे वाढविण्याची गरज-मुंबईतील समुद्रात मुले बुडण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. विशेष करून जुहू चौपाटीवर अशा घटना वारंवार होताना दिसत आहेत. याकरिता चौपट्यांवर निरीक्षण मनोरे वाढविण्याची गरज आहे. मुंबई महापालिकाचे माजी आयुक्त इकबाल चहल यांनी याबाबत जुहू चौपाटीवर निरीक्षण मनोरे वाढविण्यासाठी सूचनाही केल्या होत्या. परंतु त्यानंतर त्याबाबत विशेष लक्ष देण्यात आलेलं नाही. तसेच चौपट्यांवरील तैनात जीवन रक्षकांच्या संखेतही वाढ करण्याची गरज आहे. अनेक वर्षांपासून हंगामी स्वरूपात काम करणाऱ्या जीवन रक्षकांना कायमस्वरूपी नोकरीत घेण्याची मागणी ही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
- ऐन सणादिवशी अल्पवयीन मुलाला मृत्यूच्या दारात पोहोचावं लागलं. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. समुद्रात पोहण्याकरिता खोलवर जाणं धोक्याचं असते. अनेकजण केवळ उत्साहाच्या भरात समुद्रात पोहोण्याकरिता जातात. मात्र, त्यांना जीव गमवावा लागतो. अशा घटनांवर नियंत्रण आणण्याकरिता नागरिकांनी शिस्तीचं व नियमाचं पालन करावे, अशी सुजाण नागरिकांमधून अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेही वाचा-