मुंबई Mumbai Acid attack Case : घटस्फोट घेतला म्हणून संतापलेल्या पतीने पत्नी आणि मुलावर पहाटे पाच वाजताच्या सुमारास ॲसिड फेकल्याची खळबळजनक घटना वांद्रे येथील बेहराम पाडा परिसरात घडली आहे. याबाबत निर्मल नगर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे. आज आरोपी पतीला कोर्टात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती, निर्मल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांनी दिले आहे.
कोर्टात सुरू होती घटस्फोटाचा केस सुरु : निर्मल नगर पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितलं की, पीडित पत्नी कॅटरिंगच काम करते तर पती ऑटोरिक्षा चालक आहे. पतीला दारूचं व्यसन आहे. या दोघांचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तेव्हापासून ते वांद्रे पूर्व येथील बेहराम पाडा परिसरात राहतात. मात्र, काही दिवसांपासून दोघांमध्ये काही कारणावरून भांडण सुरू झाल्यानं वांद्रे येथील फॅमिली कोर्टात घटस्फोटाची केस सुरु होती. पाच दिवसांपूर्वी वांद्रे फॅमिली कोर्टाने त्यांच्या घटस्फोटावर निर्णय दिला.
पत्नी आणि मुलावर ॲसिड हल्ला : मनाविरुद्ध पत्नीने घटस्फोट दिल्याचा रागातून पतीने 'तू माझी नाही तर कोणाची नाही' असं म्हणत पत्नीवर ॲसिड फेकलं. पत्नी आणि मुलावर ॲसिड हल्ला केल्याची घटना सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. पत्नी आणि मुलगा त्यांच्या घरच्या दरवाज्याजवळ बसले असताना पतीने दोघांवर ॲसिड फेकले. पत्नीच्या पाठीवर, पोटावर आणि हातावर ॲसिड पडलं असून 12 वर्षीय मुलाच्या पाठीवर ॲसिड पडल्यानं दोघे जखमी झाले आहेत. दोघांवर सुरुवातीला भाभा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, नंतर त्यांना चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती, तपास अधिकारी करपे यांनी दिली.
काय आहे प्रकरण : ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती स्थिर आहे. आरोपी पतीला निर्मल नगर पोलिसांनी अटक केली असून आज कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने आरोपी पतीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पतीला पत्नीसोबत रहायचे होते मात्र, तिने त्याला घटस्फोट दिल्याने त्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला होता. पहाटे ॲसिड हल्ला केल्यानंतर पती फरार झाला होता. मात्र, त्याला निर्मल नगर पोलिसांनी उशिरा रात्री पकडले आणि आज कोर्टात हजर केले.
हेही वाचा -