मुंबई Mumbai Crime News : गरिबाला न्याय खरंच मिळतो का? मिळतो तर तो कसा आणि कधी मिळतो? असे अनेक प्रश्न वडाळ्यातील 12 वर्षीय चिमुकल्याचं धड आणि शिर मिळाल्यानंतर उपस्थित राहतात. 28 जानेवारीला 12 वर्षीय चिमुकल्याला आरोपी बिपुल शिकारी घेऊन गेला. त्यानंतर शिकारीला परिसरातील लोकांनी पकडून वडाळा टी टी पोलिसांच्या हवाली केलं. मात्र, पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळं आरोपी पोलीस ठाण्यातून पळून गेला.
पोलिसांवर कारवाई करावी : कोलकत्त्यात खुनाच्या गुन्ह्यातील दोषी आरोपी बिपुल शिकारी पॅरोलवर सुटून वडाळ्यातील शांतीनगर झोपडपट्टीत 2 महिन्यांपासून राहत होता. 28 जानेवारीला 12 वर्षीय मुलाचं अपहरण केलं गेलं. त्यानंतर 4 मार्चला मुलाचं धड तर 5 मार्चला शीर सापडलं. आरोपी बिपुल शिकारी मुलाचं अपहरण करुन पोलीस ठाण्यापर्यंत आला. मात्र, पोलिसांच्या हलगर्जीपणामुळं पळून गेल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केला. जे पोलीस आरोपी पळून जाण्यास आणि मुलाचं अपहरण केल्यानंतर त्याचा शोध घेण्यास अकार्यक्षम ठरले, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलाच्या पालकांनी केली.
पोलिसांच्या तावडीतून आरोपीनं काढला पळ : वडाळा शांतीनगर परिसरातून बेपत्ता झालेल्या 12 वर्षीय चिमुकल्याच्या आई वडिलांनी आपल्या मुलाच्या हत्येसाठी थेट पोलिसांवरच आरोप केला. मुलाच्या पालकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना आरोप केला की, 28 जानेवारी रोजी बिपुल शिकारी या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनं त्यांच्या मुलाला हॉटेलमध्ये खायला देतो, असं सांगून घेऊन गेला होता. हॉटेल घरापासून फक्त 100 मीटर अंतरावर आहे. अर्ध्या तासांत मुलगा परत येईल असं पालकांना वाटलं. मात्र, दोन तास उलटूनही त्यांचा मुलगा परत न आल्यानं त्यांनी परिसरात शोध सुरू केला. तरी चिमुकला घरी परतला नाही. मात्र आरोपी बिपुल शिकारी रात्री 12.15 च्या सुमारास परतला असता परिसरातील लोकांनी त्याला पकडून वडाळा टी टी पोलीस ठाण्यात नेलं. त्याच्या डोक्यावर आधीपासूनच असलेल्या टाक्यांमुळं रक्तस्त्राव सुरू होता. म्हणून वडाळा टी टी पोलिसांनी आरोपीला तोंड धुण्यासाठी वॉशरूममध्ये पाठवलं. तिथून तो पळून गेला. तो आतापर्यंत सापडलेला नाही.
कुटुंबीयांचे पोलिसांवर आरोप : पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात तत्परता दाखवली नाही. अन्यथा आज त्यांच्या काळजाचा तुकडा जिवंत असता, असा आरोप पालकांनी केलाय. त्यांचा मुलगा अल्पवयीन होता. सीसीटीव्हीमध्ये आरोपी बिपुल शिकारी त्याला घेऊन जाताना दिसत आहे. सर्व पुरावे देऊनही पोलीस निष्क्रिय राहिल्याचा मुलाच्या पालकांनी आरोप केला. पोलिसांनी ओळखीसाठी पालकांना बोलावून घेतले. मात्र, कपड्यांवरुन चेहरा ओळखता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच जोपर्यंत डीएनए अहवाल येत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलीय. गरिबाला न्याय मिळत नसल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली आहे. परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितलं की, त्यांची गेल्या अनेक दिवसांपासून तीन टीम राज्याबाहेर असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल.
हेही वाचा :